जमिनीच्या म्युटेशनचे अधिकार आता नोंदणी अधिकाऱ्यांकडे

महसूल खात्याकडून परिपत्रक जारी

|
26th November 2021, 12:10 Hrs
जमिनीच्या म्युटेशनचे अधिकार आता नोंदणी अधिकाऱ्यांकडे

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : जमिनीचे म्युटेशन वा जमीन नोंदणीचे अधिकार आता नोंदणी खात्याच्या अधिकाऱ्यांकडे (सबरजिस्ट्रार) दिले आहेत. त्यामुळे एका दिवसात म्युटेशन वा जमीन मालकीची नोंदणी होणे शक्य आहे. लोकांंना म्युटेशनसाठी मामलेदार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. महसूल खात्याने या विषयीचे परिपत्रक जारी केले आहे.
गोवा जमीन महसूल नियम १९६९ खाली हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. जमीन मालकाने ‘ना हरकत’ दाखल वा मान्यता दिल्याची खातरजमा नोंदणी अधिकाऱ्यांंनी (सबरजिस्ट्रार) करणे अावश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने म्युटेशनच्या यादीप्रमाणे क्रमाने म्युटेशन वा नोंदणी होणे गरजेचे आहे. यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर फेरफार करता येऊ शकते. एक चौदाच्या उताऱ्यात सरकार, कोमुनिदाद वा अन्य लोकांची नावे असल्यास म्युटेशन करता येणार नाही. असे अर्ज मामलेदारांकडे वर्ग करावे लागतील.
म्युटेशनसाठी यापूर्वी जे अर्ज मामलेदारांकडे आहेत, त्याचे म्युटेशन नोंदणी अधिकाऱ्यांंना करता येणार नाही. हे परिपत्रक पुढे येणाऱ्या अर्जांसाठी आहे. आधीच्या अर्जांसाठी नाही. एक चौदाच्या उताऱ्यात कब्जेदाराखाली अर्जदाराचे नाव नसल्यास नोंदणी अधिकाऱ्यांना म्युटेशन करता येणार नाही. असे अर्ज नियमांनुसार मामलेदारांकडे वर्ग करावे लागतील.