गोवा डेअरीच्या सभेत गोंधळ

बेकायदेशीरचा आरोप : पुढे ढकलल्याची अध्यक्षांकडून घोषणा


17th January 2021, 11:23 pm
गोवा डेअरीच्या सभेत गोंधळ

फोटो : आमसभेत अध्यक्षांना जाब विचारताना दूधउत्पादक शेतकरी.
प्रतिनिधी । गोवन वार्ता
फोंडा : गोवा डेअरीची रविवारी निश्चित केलेली आमसभा काही दूधउत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या गोंधळामुळे तहकूब करण्यात आली. सहकार निबंधकांनी आमसभा २७ डिसेंबरला निश्चित केली होती. मात्र डेअरीच्या विद्यमान व्यवस्थापनाने आमसभा १७ जानेवारी रोजी घेण्याचे ठरविले. या आमसभेस उपस्थित काही दूधउत्पादक शेतकऱ्यांनी आमसभा बेकायदेशीर असल्याचे सांगत ती तहकूब करण्याचा आग्रह धरला. अखेर सहकार निबंधकांच्या परवानगीने तारीख निश्चित होईपर्यंत आमसभा पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यमान अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी जाहीर केले.
डेअरीच्या आमसभेत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा होती. मात्र काही दूधउत्पादक व माजी संचालक यांनी आमसभाच बेकायदेशीर ठरवत कामकाज होऊ दिले नाही. सहकार निबंधकांनी निश्चित केलेली तारीख डावलून अन्य तारखेस आमसभा घेण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला असता गोंधळ सुरू झाला. अखेर अध्यक्ष शिरोडकर यांनी सहकार निबंधकांच्या परवानगीने पुढील तारीख निश्चित करून आमसभा घेण्याचे आश्वासन दिले. शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डेअरीतर्फे सहकार निबंधकांना आमसभेची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे कळविले होते, मात्र निबंधकांकडून अधिकृत परवानगी मिळाली नसल्याचे सांगितले. अधिकृत परवानगी घेऊन पुढील तारीख निश्चित करून सदर आमसभा घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
फोटो- गोवा डेअरीच्या आमसभेत संचालक मंडळाशी हुज्जत घालताना दूध उत्पादक शेतकरी.                    

हेही वाचा