मागण्या मान्य न झाल्यास प्रसंगी कायदा हाती घेऊ!

- खासगी बस मालक संघटनेचा इशारा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th November 2020, 12:14 am
मागण्या मान्य न झाल्यास प्रसंगी कायदा हाती घेऊ!

पणजी : अखिल गोवा खासगी बस मालक संघटनेच्या प्रलंबित मागण्या सरकारने तत्काळ पूर्ण कराव्या. अन्यथा बस मालकांना कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी दिला.
वाहतूक उपसंचालकांशी सोमवारी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी संघटनेने सोमवारी वाहतूक संचालक राजन सातार्डेकर यांना घेराव घालण्याचे ठरवले होते. पण त्यांची संचालकांशी भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांना उपसंचालकांसमोर पुन्हा एकदा मागण्यांचे गाऱ्हाणे मांडावे लागले.
करोना काळातील प्रवाशी कर रद्द करा, बंद करण्यात आलेली विमा सबसिडी पुन्हा सुरू करा, खासगी बसेस आणि कदंबचे तिकिट दर समान करा तसेच काही मार्गांवर बेकायदेशीररीत्या सुरू केलेल्या कदंब बसेस बंद करा, या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आम्ही अनेक दिवसांपासून वाहतूक संचालकांना भेटण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण वाहतूक संचालक आम्हाला भेट देत नाहीत. किंबहुना आमच्या मागण्याही मान्य करीत नाहीत. त्यामुळे सरकारने त्यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी ताम्हणकर यांनी केली. करोनामुळे खासगी मालक बिकट आर्थिक संकटात सापडलेले आहेत. अशावेळी त्यांच्या मागण्या तत्काळ पूर्ण करून त्यांना आधार देणे सरकारचे कर्तव्य आहे. पण सरकारला त्याचे काहीही पडलेले नाही. बस मालक आणि सरकारमध्ये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीची बैठकही घेतली जात नाही. त्यामुळे आमच्या मागण्या अजूनही पूर्ण होत नसल्याने बस मालकांत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ समन्वय समितीची बैठक घेऊन आमच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार केला पाहिजे. त्यासाठी मंगळवारपासून आपण वाहतूक खात्याला धारेवर धरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘आत्मनिर्भर’वरून निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोव्याच्या घोषणा देत आहेत. पण दुसऱ्या बाजूला आत्मनिर्भर होऊ पाहणाऱ्या राज्यातील खासगी बस मालकांची मात्र जाणीवपूर्वक सतावणूक करीत आहेत. अशाने स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न सत्यात उतरणार का, असा सवालही सुदीप ताम्हणकर यांनी उपस्थित केला.