Goan Varta News Ad

गोव्यात नग्नतेच्या पुरस्कर्त्यांचे वाढते उपद्रव

खडे बोल

Story: दीपक लाड |
14th November 2020, 11:47 Hrs
गोव्यात नग्नतेच्या पुरस्कर्त्यांचे वाढते उपद्रव

ह्ल्ली गोव्यात सार्वजनिक ठिकाणी नग्नतेचे एकामागोमाग एक असे दोन प्रसंग घडले. त्या निमित्ताने गोवेकरांना - म्हणजे आमच्या तुमच्या सारख्यांना - नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याचे उपदेश समाजांतल्या तथाकथित उच्चभ्रूंकडून लाभण्याचा ‘सुयोग’ चालून आला. 

मित्र म्हणाला, कदाचित मंत्र्यांच्या मोबायलवरून-  हेक झाल्यामुळे म्हणा- पॉर्न क्लिप पाठवली गेली असल्याचे वृत्त ऐकून पूनम पांडेने गोव्याकडे मोर्चा वळवला असावा. काणकोणमध्ये पॉर्न शूट करताना पकडली गेलेल्या पूनमने कपडे उतरवण्याचे अनेक पराक्रम यापूर्वीही केलेत, असा तिचा इतिहास सांगतो. या बाबतीत तिला आपण हिस्ट्री शीटर म्हणू शकू. २०११ मध्ये भारत क्रिकेट विश्वकप अंतिम फेरीत पोहोचताच तिने टीम जिंकल्यास आपण खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये विवस्त्र होऊ, अशी ऑफर दिली होती. आपली टीम फायनल जिंकली. तिला कोणी भाव दिला नाही. पण, त्यानिमित्ताने तिने स्वतःची फुकटची पब्लिसिटी मात्र करवून घेतली. सहा वर्षांपूर्वी मीरा रोड पोलिसांनी तिला ठाण्यावर नेली होती. कपडे तिने परिधान केले होते खरे, पण पोलिसांच्या मते ते परिधान करण्यामागचा उद्देश साध्य झाला नव्हता. ‘नशा’ नावाचा तिचा एकमेव चित्रपट गाजला तो देखील त्यावेळी जनतेने त्या चित्रपटाच्या पोस्टरांवरील तिच्या उत्तान चित्रांच्या विरोधांत आवाज उठवल्याने. तिच्या नग्नतेतल्या सौंदर्याचे रसग्रहण करण्याचा आपल्या न्याय दंडाधिकाऱ्यांना लाभलेला डोळसपणा मुंबईकरांत नसल्याने विभत्स देहप्रदर्शनाचे आरोप तिच्यावर लावले गेले होते, असंच आता म्हणावे लागेल. 

दुसरी मजेशीर बात म्हणजे जो नवरा आपल्याला बडवतो म्हणून ज्याच्या विरोधात तिने काही दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार नोंदवली होती, तोच तिचे नग्न फोटो काढत होता. कदाचित पॉर्नच्या नाटकाचा अंक सुरू होण्यापूर्वीची ती नांदी असावी.

हे प्रकरण निस्तरते तोच नवे प्रकरण पुढे आले. जगभर श्रीमंत लोक तऱ्हेवाईक तऱ्हांनी आपले वाढदिवस साजरे करतात, हे ऐकले होते. आपण पंचावन्न वर्षे या भूतलावर घालवली याचा आनंद सादरा करण्यासाठी मिलिंद सोमणने तर सार्वजनिक बीचवर (समुद्रकिनारा) चक्क नग्न धावत कहर केला. बीच जर निर्मनुष्य असेल किंवा रात्रीच्या काळोखात जर दुसऱ्याला अपशकून होत नसेल तर एक वेळ असल्या गोष्टीकडे कानाडोळा करू शकतो.   हरमल किनाऱ्याचा एक भाग न्यूड बीच म्हणून गणला जायचा. तिथे एकमेकांच्या नग्नतेतले सौंदर्य न्याहाळणाऱ्यांचा इतरांना उपद्रव होत नव्हता. य़ेथे मिलिंदच्या पत्नीने तो फोटो सरळ नेटवर शेअर करून, आ बैल मुझे मार सारखा प्रकार ओढवून घेतला. गोव्यात गांजा, चरस ओढल्याने मानसिक संतुलन ढळलेले बरेचजण किनारी भागांत लोळत असतात. जर त्यातल्या कोणीतरी ‘रनींग नेकेड ऑन गोवा बीच चॅलेंज’  देऊन टाकली तर मग सामान्य जनतेचे बीचच्या आसपासही फिरकण्याचे धाडस होणार नाही.  

गोव्यातला जनसंग्रह दोन फडांत विभागला गेलाय. सरकारच्या कचाटयातून आपल्या शेतजमीनी वाचवण्यासाठी धडपडणारे, विकासाच्या नावाखाली सरकारने होऊ घातलेले पर्यावरण विनाशी प्रकल्प, लोहमार्ग दुपदरीकरण रोखण्यासाठी झगडणारे असा घाम गाळणाऱ्या सामान्यांचा एक वर्ग. दुसरा वर्ग मुंबई आणि देशांतल्या इतर मेट्रोपॉलिटन शहरातून इथल्या किनारी भागांत वास्तव्यास असलेल्या पार्ट्या झोडणाऱ्या, आराम फरमावणाऱ्या मालदारांचा. शेल्फ लाइफ संपल्यामुळे शहरांतील ए लिस्टेड पार्ट्यांतून गाळला गेलेला, दुर्लक्षित झालेला हा समूह सवयीनुसार प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी भडकावू विवादीत विधाने देत आपले अस्तित्व दाखवण्याचा अधूनमधून केविलवाणा प्रयत्न करताना दिसतो. गोव्यात यांना जनसामान्यांतले जास्त कोणी ओळखत नसले तरी त्यांच्या पार्ट्यांत हजेरी लावणारे राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्राचे स्थानिक पत्रकार खाल्ल्या चिकन- दारूला जागत त्यांची वक्तव्ये, मुलाखती फोटोसकट वेळोवेळी छापत असतात.

वरच्या दोन्ही व्यक्तिमत्वांनी दाखवलेल्या ‘धाडसा’ चे कौतुक करणारे मॉडेल, लेखक, कलाकारांचे मौलिक विचार त्यांच्या फोटोसकट एका अख्ख्या पानावर छापत या वृत्तपत्राने आम्ही गोवेकर आजच्या युगांत किती मागासलेले आहोत, याची जाणीव करून दिली. “आमच्या संकुचित नजरेमुळे उदारमतवादी गोवा प्रदेश देशातल्या इतर मागासलेल्या भागांच्या पंक्तीत जाऊन बसेल” या धोक्याची सूचना आमच्यातल्या पाश्चात्य विचारसरणीच्या गोंयकार लेखक आणि संगीतकाराने देऊन टाकलीय. 

पूजा बेदी म्हणते, बिभत्सता आम जनतेच्या मेंदूत असते, नग्नतेचे प्रदर्शन करणाऱ्यांच्या कृतीत नव्हे. हिची आई प्रोतिमा बेदी १९७४ मध्ये जूहू बीचवर नग्न धावली होती. आता त्यात स्त्री विमुक्ती, सशक्तीकरणाचा भाग तसा नव्हता काही. रूसी करांजीया हे कडवे डाव्या विचारसरणीचे गृहस्थ ब्लिट्झ नावाचे साप्ताहीक प्रकाशित करायचे. त्यांनी सिने जगतांतली लफडी, भानगडी छापून पैसे कमवण्यासाठी सीने ब्लिटझ नामक मासिक सुरू करण्याचे ठरवले होते. मासिकाच्या शुभारंभाचा अंक प्रोतिमाचा नग्न अवतार छापून धमाका उडवून देण्याचा पब्लिसिटी स्टंट त्यांनी आखला होता. अपेक्षेनुसार पहिला अंक धडाधड विकला गेला. लहानपणापासून हेच बाळकडू पिऊन पूजा वाढली असल्याने मिलिंदचा स्टंट तिला कौतुकास्पद वाटणे साहजिक आहे. 

शोभा डेचे तर्क अफलातून असतात. तिच्या मते उत्तर भारतात पुरूष निराधार स्त्रियांना गोळ्या घालत असतात, तर एक पुरूष गोव्याच्या बीचवर नागडा धावला तर ते कृत्य एवढे धोकादायक का मानले जावे? उत्तर भारतात पुरूष स्त्रियांचा लैंगिक छळ करतात म्हणून गोव्यात पुरूषांना नग्न धावण्याचा परवाना द्यावा ही तर कुतर्काची पराकाष्ठाच म्हणावी लागेल. 

आपण मिलिंदला गेली २० वर्षे ओळखतो आणि तो केवळ सनसनाटी फैलावण्यासाठी असले कृत्य करणार नसल्याची ग्वाही गौतम कपूर नावाचा मॉडेल देतोय. तर मग मिलिंद आणि मधूश्री (मधू) सप्रे या व्दयीने विवस्त्र होत एका अजगरच्या आड आपली लज्जा लपवण्याचा प्रयत्न करत एका बूटाचा ब्रांड प्रमोट करणारी जाहिरात सनसनाटी उडवून प्रचार करण्याचा प्रकार नव्हता काय? ते तर नग्नतेचे चक्क व्यापारीकरण होते भाऊ. 

मिलिंदची बायको म्हणते, त्याचे ते नंगा फकीर धावणे म्हणजे आनंद आणि स्वातंत्र्याची अभिव्यक्ती आहे. आमच्या गोव्यातल्या तथाकथित मॉडेलांच्या म्हणण्यानुसार त्याने नग्न धावत एक मोठे उद्दीष्ट्य साध्य केलेय. त्याचे रेखीव शरीरसौश्ठव पाहून आमच्या मॉडेलनी प्रेरीत होणे इतपत ठीक आहे. पण, समजा मिलिंद एक लंगोट मारून धावला असता तरी त्याच्या त्या कमवलेल्या कायेचे जेवढे घडवले तेवढेच दर्शन झाले असते ना! एक इवलासा लंगोट त्याच्या स्वातंत्र्यावर किंवा आनंदावर कसा काय गदा आणू शकतो बुवा?   

आपल्या येथे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे कारण देत लोकानां लक्ष्य करत इंटरनेटवर दिवसभर लोळणारा, अधूनमधून पोलिस स्टेशनांत तक्रारी दाखल करणारा असा अतीसंवेदनशील लोकांचा झूंड आहे. राज्यातल्या एका अध्यापिकेने मंगळसूत्राच्या विरोधात मत मांडले तर सध्या गोव्यात वास्तव्यास असलेला एक मूळ बिहारी भलताच खवळलेला दिसतोय. आपण पूजापाठ करणारा ब्राह्मण असल्याने या वक्तव्यामुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्याने त्याने तिच्याविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल केलीय. दोन ब्राह्मण कार्ट्यांनी गोव्यात सार्वजनिक ठिकाणी नंगा नाच केला असताना हा गप्प का, असा प्रश्न पडतो. तेव्हा भावना का दुखवल्या गेल्या नाहीत? पूनम पांडेच्या बाबतीत तर भावना दुपटीने दुखावल्या जायला हव्या होत्या. कारण तिचे फोटो काढणारा पती– प्रियकर मुसलमान असल्याने योगी आदित्यनाथ ज्या लव जेहादविरूद्ध कायदे बनवायला निघालेत, त्याचा अँगलही या येथे डोकावतो.  

जगातले मानवेतर प्राणी नग्न वावरत असल्याने त्यांना ते अंगवळणी पडलेय. एक दुसऱ्याच्या नग्नतेत सौंदर्य वगैरे पाहण्याचा प्रश्न तिथे उद्भवत नसतो. मानव सामाजिक प्राणी बनल्यावर त्याने आपले गुप्तांगे झाकण्याचे ठरवून नियम कायदे बनवलेत म्हणून ते पाळायला हवेत. विशिष्ट पंथाचे साधू, गुरू मंडळी नग्न राहतात हा अपवाद युक्तिवाद होऊ नये, कारण ते बहुधा समाजाविमूख जीवन कंठतात. बनवलेले कायदे मोडलेत का हे बघणेदंडाधिकाऱ्यांचे काम, पॉर्नमध्ये सौंदर्य कसे बघावे हा उपदेश देण्याचा उपद्व्याप नव्हे. असले प्रकार हाताबाहेर जाण्यापूर्वीच या नागड्या नरकासुरांना वेळीच वेसण घालणे गरजेचे. 

(लेखक विविध विषयांचे व्यासंगी आहेत.)