Goan Varta News Ad

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कोलकाता विजयी

|
24th October 2020, 11:16 Hrs
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कोलकाता विजयी

अबुधाबी : आयपीएल २०२० च्या ४२ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी पराभव करत स्पर्धेतील आपला सहावा विजय नोंदविला. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ६ बाद १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ वरुण चक्रवर्तीच्या (२० धावांत ५ बळी) उत्कृष्ट गोलंदाजीसमोर ९ बाद १३५ धावाच करू शकला. नितीश राणाला ८१ धावांच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
कोलकाताकडून मिळालेल्या १९५ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता अजिंक्य रहाणे पॅव्हिलियनमध्ये परतला. पॅट कमिन्सने त्याची शिकार केली. यानंतर तिसऱ्या षटकात शानदार फॉर्ममध्ये असलेला शिखर धवन अवघ्या सहा धावा काढून बाद झाला. कमिन्सने धवनला पॅव्हेलियनमध्येही पाठवले.
पंत-अय्यरने दिल्लीला सावरले
१३ धावांत दोन गडी गमावल्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी ६३ धावांची भागिदारी केली. परंतु दोघेही वेगाने धावसंख्या पुढे नेण्यात अपयशी ठरले. पंतने ३३ चेंडूत २७ धावा केल्या. पंत बाद झाल्यानंतर शिमरन हेटमायेरही पाच चेंडूंत १० धावा करून माघारी परतला.
चक्रवर्तीचा दिल्लीविरुद्ध झंझावात
यानंतर वरुण चक्रवर्ती याने संपूर्ण दिल्ली संघाला गुंडाळून टाकले. पहिल्या दोन चेंडूंमध्ये वरुणने हेटमायेर आणि अय्यरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर स्टोईनिस (६) आणि अक्षर पटेल (९) हे वरुणचे बळी ठरले. अशा प्रकारे दिल्ली कॅपिटलने २० षटकांत केवळ १३५ धावा केल्या.
कोलकाताकडून गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने शानदार कामगिरी केली. आयपीएलमध्ये पाच विकेट घेणारा तो दुसरा अनकॅप्ड गोलंदाज आहे. त्याने चार षटकांत केवळ २० धावा देऊन पाच बळी घेतले. याशिवाय पॅट कमिन्सनेही चार षटकांत १७ धावा देऊन तीन गडी बाद केले.
तत्पूर्वी, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पृथ्वी शॉ आणि डॅनियल सॅम्स यांच्या जागी अजिंक्य रहाणे आणि एनरिक नॉर्त्झे यांना संघात स्थान देण्यात आले. कोलकाता नाईट रायडर्स संघात टॉम बँटन आणि कुलदीप यादवच्या जागी सुनील नारायण आणि कमलेश नागरकोटी यांचा समावेश केला.
कोलकाताची खराब सुरुवात
कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात चांगली नव्हती आणि पॉवरप्लेच्या आत दोन मोठे धक्के त्यांना बसले होते. एर्निक नोर्त्झेने दुसऱ्या षटकात ११ धावांवर शुभमन गिल (९) आणि सहाव्या षटकात राहुल त्रिपाठी (१३) यांना एकूण ३५ धावांवर बाद केले. पॉवरप्लेनंतर कागिसो रबाडानेही दिनेश कार्तिकला (३) आठव्या षटकात एकूण ४२ धावांवर बाद केले.
नितीश राणाची तुफान खेळी
मात्र दुसऱ्या बाजूला नितीश राणाने चांगली खेळी केली व संघात परतलेल्या सुनील नारायणसह त्याने चौथ्या विकेटसाठी ११५ धावांची मजबूत भागिदारी केली. दोन्ही फलंदाजांनी १२ व्या षटकात संघाला १०० धावांवर नेले. नितीश राणाने ३५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले तर सुनील नारायणने केवळ २४ चेंडूत अर्धशतक झळकावले.
सुनीलने ३२ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६४ धावांची शानदार खेळी केली. त्याला १७ व्या षटकात एकूण १५७ च्या स्कोअरवर रबाडाने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. नितीश राणाने ५३ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकारांसह ८१ धावांची शानदार खेळी साकारली आणि इयॉन मॉर्गन (९ चेंडू १७ धावा) याच्यासह त्याने संघाला १९० धावांपर्यंत नेले. शेवटच्या षटकात स्टोईनिसच्या शेवटच्या दोन चेंडूवर राणा आणि मॉर्गन बाद झाले. कोलकाता नाईट रायडर्सने अखेरच्या १० षटकांत ११९ धावा केल्या. दिल्ली कॅपिटलसाठी कागिसो रबाडा, मार्कस स्टोईनिस आणि एनरिक नोर्त्जे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
सुरूवातीला संयमी आणि नंतर फटकेबाज खेळी करत नितीश राणाने ३५ चेंडूत अर्धशतक ठोकले. हे त्याचे आयपीएल कारकिर्दीतील १०वे अर्धशतक ठरले. या स्पर्धेत १० अर्धशतके ठोकणाऱ्या महेला जयवर्धने, कुमार संगाकारा, ख्रिस लीन आणि करूण नायर यांच्या पंगतीत नितीश राणाने स्थान पटकावले. राणाने ५३ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकार लगावत ८१ धावांची खेळी केली.