मोले येथील विद्युत प्रकल्प नियोजित जागीच

दीपक पाऊस्कर : बिगर सरकारी संस्थांचा नाहक विरोध

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th September 2020, 12:13 am

फोंडा : मोले येथे येऊ घातलेल्या ४०० केव्ही विद्युत वहिनी प्रकल्पाला स्थानिकांचा पाठिंबा आहे. मात्र, पर्यावरणाच्या नावाखाली काही बिगरसरकारी संस्था या प्रकल्पाला नाहक विरोध करीत असून स्थानिकांना चिथवण्याचे प्रकार सुरू आहेत. परंतु, सरकार स्थानिकांच्या सूचनांंनुसार या प्रकल्पाच्या नियोजनात आवश्यक ते बदल करण्यास तयार असून हा प्रकल्प नियोजित जागीच उभारला जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊस्कर यांनी सांगितले.
या प्रकल्पासंबंधी चर्चा करण्यासाठी शनिवारी सायंकाळी माकडये-मोले येथे बोलावलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत वीजमंत्री नीलेश काब्राल, मोलेच्या सरपंच तन्वी केरकर, सावर्डेचे सरपंच संदीप पाऊसकर, धारबांदोड्याच्या सहाय्यक मामलेदार शर्मिला गावकर, मोलेचे उपसरपंच सुशांत भगत, मोले व कुळेचे पंच तसेच विद्युत प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी निनाद पितळे व स्थानिकांसह विविध संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नोकऱ्यांसाठी स्थानिकांनाच प्राधान्य : पाऊस्कर
आगामी काळातील गोव्याची विजेची गरज पाहता हा प्रकल्प अत्यावश्यक असून या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, याची सरकार काळजी घेईल. या प्रकल्पात नोकऱ्यांसाठी स्थानिकांनाच प्राधान्य दिले जाणार असून ज्या लोकांची जागा किंवा बागायतीतून हा प्रकल्प जाईल त्यांना सरकारतर्फे दुप्पट भरपाई दिली जाईल, असेही पाऊस्कर यांनी सांगितले.
वीजमंत्री, प्रकल्प अधिकाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न
वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी प्रकल्पासंबंधी माहिती देण्याचा प्रयत्न केला असता बिगर सरकारी संस्थांंच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बोलण्यास हरकत घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. प्रकल्प अधिकारी पितळे यांनी या प्रकल्पासंबंधी उपस्थितांना माहिती देण्याचा प्रयत्न केला असता बिगर सरकारी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनाही घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकल्प हानिकारक नसून त्याचा फायदा संपूर्ण गोव्याला मिळणार असल्याचे पितळे यांनी सांगितले. तसेच वन्यक्षेत्र वगळता स्थानिकांच्या शेती-बागायतींचा विचार करून अन्य पर्यायांचा विचार करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, यावेळी विरोधकांनी त्यांना आवरते घ्यायला भाग पाडले. यावेळी पर्यावरणीय संस्थांंचे कार्यकर्ते तसेच काही स्थानिकांनी विविध प्रश्न विचारून दोन्ही मंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, येत्या ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत या विषयावर चर्चा करण्याचे ठरवून ही बैठक आटोपती घेण्यात आली.
या बैठकीत तणाव निर्माण होण्याच्या शक्यतेने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एक-दोन वेळा प्रकरण हातघाईवर पोहोचले. मात्र, पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते व त्यांच्या पथकाने वेळीच हस्तक्षेप करून हे प्रकरण नियंत्रणात आणले.
सरकारने गोव्याचे निसर्गसौंदर्य नेस्तनाबूत करण्याचा विडा उचलला असून कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पाचे समर्थन केले जाणार नाही. _ हृदयनाथ शिरोडकर, पर्यावरणप्रेमी
हा प्रकल्प गोव्यासाठी तसेच इथल्या पर्यावरणासाठी घातक असून शेवटपर्यंत या प्रकल्पाला आमचा विरोधच रहाणार आहे. _ प्रा. प्रजल साखरदांडे, इतिहास अभ्यासक