धनादेशाद्वारे १.७० लाखांची चोरी

साल्वादोर द मुंद येथील मोलकरणीला अटक


12th January 2018, 03:49 am
प्रतिनिधी | गोवन वार्ता
म्हापसा : मरड - म्हापसा येथील एका वृद्धेच्या घरातील लॉकरमधील धनादेश चोरून १ लाख ७० हजारांची रक्कम बँक खात्यातून काढल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी मोलकरीण यामिनी मधुकर नागवेकर (साल्वादोर-द-मुंद) हिला अटक केली आहे.
ग्रँड मरड येथील ८५ वर्षीय क्लारा फारिया यांच्या काळजीवाहू मर्लिन डिसोझा (म्हापसा) यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
याबाबत म्हापसा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध घर मालकीणीची मोठी बहीण अॅग्नेस ब्रिटो यांचे गेल्या ऑगस्टमध्ये निधन झाले. मयत ब्रिटो यांचा मुलगा वेनसलस ब्रिटो व त्यांची पत्नी अरो ब्रिटो हे युनायटेड किंगडम (यूके) येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी आपल्या आईचा मृत्यूनंतर मावशी क्लारा फारिया यांच्या व घराच्या देखभालीसाठी काळजीवाहूची जबाबदारी फिर्यादी मर्लिन डिसोझा यांच्यावर सोपविली होती. शिवाय घरखर्चासाठी फारूक नामक खासगी अकाऊन्टंटमार्फत घरातील लॉकरमध्ये ‘बेरर' धनादेश ठेवले होते. घर मालकीन क्लारा डिसोझा हिची देखभाल व घरकामासाठी मर्लिन डिसोझा यांनी पणजी येथील ‘गोवा हाऊस मेड संघटने'मार्फत संशयित आरोपीला घरकामाला ठेवले होते. संशयित आरोपी युवतीने दि. ५ डिसेंबर ते दि. २ जानेवारी या काळात लॉकरमधील चार धनादेशांची चोरी केली व येथील कॅनरा बँकेच्या खात्यातून त्या धनादेशांच्या आधारे १ लाख ७० हजार रुपयांची चोरी केली.
चार दिवसांपूर्वी घरातील चार धनादेश चोरीला गेल्याचे खासगी अकाऊन्टंट फारूख याच्या नजरेस आले असता त्यांनी मर्लिन यांना ही माहिती दिली. या धनादेशाच्या आधारे १ लाख ७० हजार रुपये काढल्याची माहिती बँकेतून मिळाली. त्यापूर्वी ती युवती घरगुती कारण सांगून रजेवर गेली होती. फिर्यादी व अकाऊन्टंटला तिच्यावर संशय आला. त्यांनी दि. ११ रोजी संशयित युवतीला घरी बोलावून घेतले तेव्हा तिने चोरीची कबुली दिली.