तुम्ही म्हणाल ‘व्हॅलेंटाईन डे’चा ‘साद निसर्गाची’ सदराशी काय संबंध? संबंध आहे! अन् तोही चकित करण्यासारखा. कारण जोडीदार निवडण्याच्या बाबतीत वन्यजीवही माणसासारखेच वागतात.

व्हॅलेंटाईन आठवडा नुकताच संपला. मानवाच्या भावनिक नात्यांना अधिक दृढ करण्याचा, आपल्या प्रिय व्यक्तीप्रती प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आठवडा. भारत देशात युवक-युवती, प्रेमीयुगुल, नवरा-बायको हा आठवडा मनसोक्त साजरा करतात. व्हॅलेंटाईन आठवड्यातील एक दिवस प्रियकर/प्रेयसी प्रेयसीला/प्रियकराला गुलाबपुष्प देऊन प्रभावित करतात. आपल्या प्रिय व्यक्तीला विशेष वाटावे म्हणून कधी चॉकलेट तर कधी टेडी बेअर अश्या भेटवस्तू देतात. कधी प्रेमाचा प्रस्ताव मांडत व वचन देत नात्याप्रती कटिबद्ध असल्याची ग्वाही देतात तर कधी आलिंगन देत, चुंबन घेत नात्यातील ओलावा पुनर्जीवित करतात.
मानव हा स्वभावतः सामाजिक प्राणी असल्यामुळे आपल्या आयुष्यात नाती, भावना आणि प्रेम यांना खूप महत्त्व आहे. माणसाच्या बाबतीत बहुतांश वेळा मुलीला आकर्षित करण्यासाठी मुलगा पुढाकार घेतो. आपल्या प्रिय व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी भेटवस्तू देतो. मुलाला होकार/नकार कळवण्यापूर्वी मुलगी कित्येक बाबींचा सखोल विचार करते. मुलाचे घर कसे आहे, त्याची आर्थिक परिस्थिति कशी आहे, त्याची निर्णय घेण्याची क्षमता, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास ह्या सर्व गोष्टींचा सखोल विचार करूनच ती आपला होकार किंवा नकार कळवते. मुलीने गुलाब/भेटवस्तू स्विकारली तर समजायचं की ‘मुलगी पटली’. तुम्ही म्हणाल याचा ‘साद निसर्गाची’ सत्राशी काय संबंध? संबंध आहे! अन् तोही चकित करण्यासारखा. कारण जोडीदार निवडण्याच्या बाबतीत वन्यजीवही माणसासारखेच वागतात.
मादीवर प्रभाव पाडण्यासाठी नर वन्यजीव विविध कौशल्य व तंत्रांचा वापर करतात. सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे मोर. राष्ट्रीय पक्षी मोर मादीला आकर्षित करण्यासाठी आपला रंगीबेरंगी व भव्य पिसारा फुलवून नृत्य करतो. त्याच्या या आकर्षक नृत्य प्रदर्शनामुळे मादी मोर प्रभावित होते. अनेक नर पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी मधुर गाणी गातात. नर पक्ष्याचा आवाज जितका सुरेल व तीव्र तितकीच मादी आकर्षित होण्याची शक्यता जास्त. आणखीन काही उदाहरणे द्यायची झाली तर मादी ‘बया विवर’ पक्षीणीला प्रभावित करण्यासाठी नर अतिशय कलात्मक असे घरटे बांधतो. बया विवर नर पक्षी आपल्या चोचीचा वापर करून गवत, काड्या आणि इतर साहित्य विणून अत्यंत गुंतागुंतीचे, हवेत लटकणारे घरटे तयार करतो. हे घरटे बांधण्यासाठी त्यांना साधारणतः १८ ते २० दिवस लागू शकतात. प्रजनन हंगामात नराच्या डोक्यावर तेजस्वी पिवळा मुकुट (किरिट) तयार होतो, जो त्याच्या कलात्मक घरट्यांना अधिक आकर्षक बनवतो. सुंदर आणि मजबूत घरटे हे त्याच्या कौशल्याचे प्रतीक असते, ज्यामुळे मादी त्याची निवड करते. सारस क्रेन हे पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी खास नृत्य करतात. विणीच्या काळात नर आणि मादी सारस दोघेही उंच उड्या मारणे, पंख पसरवणे, मान उंचावणे आणि एकमेकांसमोर तालबद्ध हालचाली करणे अशा आकर्षक गोष्टी करतात. ह्या नृत्याद्वारे ते समन्वय, एकमेकांप्रति असलेली निष्ठा आणि जोडीदारावरील प्रेम अधोरेखित करतात.
काही प्राणी उदाहरणार्थ नर पेंग्विन मादी पेंग्विनला आकर्षित करण्यासाठी भेटवस्तू देतात. नर पेंग्विन मादी पेंग्विनला भेट म्हणून गुळगुळीत दगड देतो. भेटवस्तू आवडल्यास मादी पेंग्विन नराचा स्विकार करते. वाघ, हरिण, शेळ्या यासारखे प्राणी गरज पडल्यास मादीला मिळवण्यासाठी इतर नरांशी झुंज देतात. जिंकणारा नर मादीशी संयोग करतो. काही नर अन्न व सुरक्षित जागा असलेले क्षेत्र राखतात. यामुळे मादी आकर्षित होते. कित्येक सर्प फेरोमोन नावाचे सुगंधी रसायन सोडतात, ज्यामुळे मादीला त्यांच्या उपस्थितीची जाणीव होते. काही कोळी तालबद्ध हालचाली करतात. बेडूक मोठ्याने आवाज करून मादीला आकर्षित करतो. व्हेल मासे लांब व गुंतागुंतीची गाणी गातात. काही कीटक मादीसाठी अन्न आणतात. वन्यजीवांचा स्वभाव वर्तवणारी ही आणखीन काही उदाहरणे. निसर्गात स्वत:च्या प्रजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वन्यजीव हे सारे डावपेच करतात. आपल्या पुढील पिढयांना अधिक सक्षम बनवण्यासाठी मादी सहसा ताकदवान व निरोगी नराची निवड करत असते.

- स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)