गोवा : म्हापसा पालिका व्यापारी संकुलाला अखेर ‘पूर्णत्व प्रमाणपत्र’ जारी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
गोवा : म्हापसा पालिका व्यापारी संकुलाला अखेर ‘पूर्णत्व प्रमाणपत्र’ जारी

म्हापसा नगरपालिकेचा व्यापारी संकुल प्रकल्प.

म्हापसा : आंगड (Angad) येथील म्हापसा नगरपालिकेच्या (Mhapsa Municipality) नवीन व्यापारी संकुल प्रकल्पाला (Traders Complex Project) उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाकडून पूर्णत्व प्रमाणपत्र मिळाले आहे. या इमारतीचा एक महत्त्वाचा अडथळा दूर झाला असून हे संकुल कार्यान्वित करण्यासाठी पुढील टप्प्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
जीसूडामार्फत २०.५७ कोटी खर्चून बांधलेल्या या व्यापारी संकुलाचे गेल्या जून २०२५ मध्ये तात्पुरते अनावरण करण्यात आले होते. मात्र, प्रकल्पाला एनजीपीडीएकडून पूर्णत्व प्रमाणपत्र न मिळाल्याने हा प्रकल्प सुरू झाला नव्हता.‍ कारण इमारतीचा बांधकाम परवाना कालबाह्य झाला होता. त्यामुळे पालिकेला आपल्याच प्रकल्पाला भोगवटा प्रमाणपत्र देता येत नव्हते. त्यानंतर कालबाह्य झालेल्या बांधकाम परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी एनजीपीडीएकडे अर्ज करण्यात आला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्व प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे.
नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी सांगितले की, अलंकार थिएटर जवळील पालिकेच्या व्यावसायिक संकुल प्रकल्पासाठी प्रक्रियेअंती एनडीपीडीएने पूर्णत्व प्रमाणपत्र जारी केले आहे. लवकरच पालिकेकडून प्रकल्पाला भोगवटा प्रमाणपत्र देखील दिले जाईल.
प्रकल्प ६ वर्षांनी आला पूर्णत्वास
हा व्यापारी संकुल प्रकल्प म्हापसा पालिकेच्या महसूल प्राप्तीचा एक प्रमुख प्रकल्प आहे. २०१९ मध्ये या प्रकल्पाचे काम हाती घेतले होते आणि अनेक मुदती चुकल्यानंतर ६ वर्षांनी हा प्रकल्प पूर्णत्वास आला होता. अनावरणानंतर गेले पाच महिने प्रमाणपत्रांच्या प्रतीक्षेत होता. शिवाय या प्रकल्पाच्या बांधकामावर एका व्यक्तीने हरकत घेतल्यामुळे प्रकल्प न्यायप्रविष्ठ बनलेला आहे.      

हेही वाचा