'रंगीता एंटरप्रायझेस' पॉन्झी घोटाळा : सामान्यांना ९ कोटींचा गंडा

मुख्य संशयिताची ६१ लाखांची मालमत्ता 'ईडी'कडून तात्पुरती जप्त

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd October, 06:49 pm
'रंगीता एंटरप्रायझेस' पॉन्झी घोटाळा : सामान्यांना ९ कोटींचा गंडा

पणजी: 'मे. रंगीता एंटरप्रायझेस' (M/s Ranggeeta Enterprises) या नावाने चालवल्या गेलेल्या पॉन्झी योजनेतील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. 'ईडी'च्या पणजी विभागीय कार्यालयाने मुख्य आरोपी गोहिल जयकुमार आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या सुमारे ६१.५३ लाख रुपये (अंदाजे) मूल्याच्या मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये दोन निवासी फ्लॅट, मुदत ठेव (Fixed Deposit) आणि इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.

'ईडी'ने गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गोहिल जयकुमार आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे तपास सुरू केला होता. एफआयआरनुसार, गोहिल जयकुमार आणि त्याच्या साथीदारांनी अनेक फसव्या गुंतवणूक योजना चालवल्या, ज्याद्वारे जनतेला ९.३३ कोटींहून अधिक रुपयांना गंडा घातला होता.

दरमहा २० टक्के परताव्याचे आमिष

'ईडी'च्या तपासात उघड झाले की, गोहिल जयकुमार हा मे. रंगीता एंटरप्रायझेस या अनोंदणीकृत संस्थेमार्फत (Unregistered Entity) गोवा आणि गुजरातमधील विविध कार्यालयांतून सार्वजनिक गुंतवणूक स्वीकारत होता. गुंतवणूकदारांना दरमहा २० टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखवले गेले. हे सर्व पैसे गोहिल जयकुमार आणि त्याच्या एजंटच्या वैयक्तिक बँक खात्यात थेट जमा केले जात होते. ही योजना पूर्णपणे पॉन्झी स्वरूपात चालत होती आणि एप्रिल-मे २०२२ मध्ये जेव्हा पैसे काढण्याचे प्रमाण नवीन गुंतवणुकीपेक्षा जास्त झाले, तेव्हा ही योजना कोलमडली.

घोटाळ्यातील ही रक्कम कोणत्याही कायदेशीर व्यवसायात न गुंतवता, आरोपींनी ती आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचे सिद्ध झाले आहे. या रकमेतून स्थावर मालमत्ता खरेदी करणे, वैयक्तिक गुंतवणूक करणे, उधळपट्टीचा जीवनशैली चालवणे आणि इतर खाजगी खर्च भागवणे यासाठी गैरवापर करण्यात आला होता. या प्रकरणाचा पुढील तपास 'ईडी'कडून सुरू आहे.

हेही वाचा