वेदांता सेसा गोवाची खाण कामगारांसाठी ‘व्हीआरएस’ जाहीर

१० वर्षे सेवा किंवा ४० वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी संधी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd June, 12:43 am
वेदांता सेसा गोवाची खाण कामगारांसाठी ‘व्हीआरएस’ जाहीर

पणजी : गोव्यातील अग्रगण्य खाण कंपन्यांपैकी एक असलेल्या वेदांता सेसा गोवा कंपनीने आपल्या खाण कामगारांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना (व्हीआरएस) जाहीर केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी कंपनीत १० वर्षे सेवा पूर्ण केली आहे किंवा ज्यांचे वय ४० वर्षे पूर्ण झाले आहे, असे कर्मचारी या योजनेसाठी पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी २१ जून ते ५ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करणे आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीला नुकताच लिलावात खाणकाम ब्लॉक मिळाला असला तरी, २०१२ पासून आणि पुन्हा २०१८ पासून खाण बंदीमुळे हा उद्योग पूर्वीइतका सक्रिय राहिलेला नाही. खाण व्यवसायाची व्याप्ती कमी झाल्यामुळे, गरजेएवढ्याच कामगारांची संख्या राखणे आणि कार्यक्षमता वाढवणे या उद्देशाने व्हीआरएस लागू करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
१ जून २०२५ पर्यंत १० वर्षे सेवा पूर्ण केलेले किंवा ४० वर्षे पूर्ण केलेले कर्मचारी या योजनेसाठी पात्र असतील. या योजनेत ग्रॅच्युइटी, पीएफ, उर्वरित रजेचे पैसे आणि इतर फायदे दिले जातील. कामगारांना पूर्ण झालेल्या सेवेच्या वर्षांसाठी ३० दिवसांचा पगार किंवा निवृत्तीपर्यंतच्या उर्वरित सेवेसाठी पगार यापैकी जी रक्कम कमी असेल, ती भरपाई म्हणून मिळेल. योजनेनुसार, एकदा अर्ज केल्यानंतर तो मागे घेता येणार नाही आणि अर्ज मंजूर करण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे सुरक्षित राहील.
खाण उद्योगातील बदलांचा परिणाम
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर २०१२ मध्ये खाणी सर्वप्रथम बंद झाल्या होत्या. बंदी उठवल्यानंतर जानेवारी २०१५ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत त्या पुन्हा सुरू झाल्या, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खाण उद्योग पुन्हा थांबला. कंपनीची पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आल्याने, आता खाण उद्योगाचे प्रमाण आणि पद्धत बदलली आहे. या बदललेल्या परिस्थितीत, कंपनीने कामगारांच्या हिताचा विचार करून व्हीआरएस योजना जाहीर केली असल्याचे एका पत्रात नमूद केले आहे.
........
लवकर अर्ज करणाऱ्यांना विशेष लाभ :
* २१ ते २५ जून २०२५ दरम्यान अर्ज करणाऱ्यांना अतिरिक्त १ लाख रुपयांची भरपाई.
* २६ ते २८ जून २०२५ दरम्यान अर्ज करणाऱ्यांना अतिरिक्त ४० हजार रुपयांचा लाभ.