साप्ताहिकी- कॅन्सरवरील उपचार पद्धतीसह शॅक, टाऊट्स विषयीच्या निर्णयाची चर्चा

माध्यान्ह आहारासाठी 'अक्षय पात्र' सोबत सरकारची भागीदारी चालू राहील असेही सांगण्यात आले आहे.

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
22nd March, 11:56 pm
साप्ताहिकी- कॅन्सरवरील उपचार पद्धतीसह शॅक, टाऊट्स विषयीच्या निर्णयाची चर्चा

पणजी : या आठवड्यात सरकार घेत असलेले सकारात्मक निर्णय दिसून आले. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी अॅलोपॅथिक आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा एकत्रित वापर करण्याच्या प्रक्रियेसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच राज्यात सुरु असलेल्या 'अक्षय पात्र' या योजने अंतर्गत तुरुंग आणि रुग्णालयांमध्ये अन्न पुरवण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच माध्यान्ह आहारासाठी 'अक्षय पात्र' सोबत सरकारची भागीदारी चालू राहील असेही सांगण्यात आले आहे. दुसर्‍याला चालवायला दिलेल्या शॅक बाबत सरकारने कठोर पाऊले उचलली असून २३ शॅक १५ दिवसांच्या आत पाडण्याचे आदेश पर्यटन खात्याने दिले आहेत. यासह राज्यातील खून, चोरीच्या घटनांचे ग्रहण काही सुटेना असे चित्र दिसत आहे. पूर्ववैमनस्यातून कुठ्ठाळी येथे एका कामगारावर चाकू हल्ला आणि त्यातच कामगाराचा झालेला मृत्यूची घटना आठवडा अखेरीस घडली.


 
रविवार.
* आता कॅन्सरवर शोधणार आयुर्वेद- अॅलोपॅथीची मात्रा
गोव्यात कॅन्सरवर उपचार करण्यासाठी अॅलोपॅथिक आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा एकत्रित वापर करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी संशोधन आणि एसओपी तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी डॉक्टर आणि अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 
* केरी सत्तरी तपासणी नाक्यावर ५०० किलो बेकायदेशीर बीफ जप्त
केरी येथील तपासणी नाक्यावर पोलिसांच्या भरारी पथकाने कारवाई करून दोन वाहनांतून सुमारे ५०० किलो बीफ जप्त केले या बीफची किंमत २ लाख ७५ हजार रुपये आहे. पोलिसांनी बीफ व दोन वाहने अशी १८ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे.
------------------------------------
सोमवार
* 'अक्षय पात्र'चा आहार तुरुंगासह इस्पितळांतही देण्याचा विचार

सरकारने भविष्यात तुरुंग आणि रुग्णालयांमध्ये 'अक्षय पात्र'चे अन्न पुरवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच माध्यान्ह आहार पुरवणारे स्वयंसेवी गट बंद केले जाणार नाहीत किंवा त्यांची संख्या देखील वाढवली जाणार नाही, फक्त त्यांना चांगल्या दर्जाचे अन्न द्यावे. माध्यान्ह आहारासाठी अक्षय पात्र सोबत सरकारची भागीदारी चालू राहील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

 
* अबकारी निरीक्षकाकडूनच चक्क दारू तस्करी 

मद्यासंबंधी अन्य गैरव्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी तत्पर असणाऱ्या अबकारी खात्याच्या एका निरीक्षकाने चक्क दारूची तस्करी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवमोग्गा जिल्ह्यातील सागर शहरातील कागोडू येथे दारू तस्करी करताना कर्नाटक अबकारी विभागाने गोव्याच्या अबकारी निरीक्षकाला रंगेहाथ पकडले आहे.

 
* रुद्रेश्वर- पणजीच्या 'मीडिआ'चा महाराष्ट्रात डंका 
६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धेत रुद्रेश्वर-पणजी संस्थेच्या 'मीडिआ' या नाटकाने प्रथम क्रमांकांचे सहा लाखांचे प्रथम पारितोषिक पटकावले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

 
------------------------------------
मंगळवार
* मुख्यमंत्री-दामू दिल्लीत,मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना ऊत

सभापती रमेश तवडकर यांनी काहीच दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यांमुळे राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या चर्चांना ऊत आलेला असतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मंगळवारी दिल्लीत हजेरी लावत गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या.

 

* स्मार्ट कार्डमुळे ईव्ही बसमधील प्रवाशांची संख्या रोडावली 
पणजी स्मार्ट सिटीमध्ये सुरू असलेल्या बसेसमध्ये स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. जे नियमितपणे प्रवास करत नाहीत, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जास्त माहिती नसलेल्यांनीही ईव्ही-बसमधून प्रवास करणे बंद केल्याचे 'कदंब'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

 
------------------------------------
बुधवार
* पिळर्ण येथील दरोड्याचा २४ तासात छडा

मार्रा-पिळर्ण येथे गोव्यातील मासळी आणि बिडी वितरक पप्पू बिश्वास यांच्या घरावर पडलेला दरोड्याचा २४ तासांच्या आत पर्वरी पोलिसांनी छडा लावला. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना अटक केली. या दरोड्यात २४ लाखांच्या मुद्देमालावर संशयितांनी डल्ला मारला असून दरोडेखोरातील तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

 
* किनारी भागात स्थानिक टॅक्सी चालकांकडून चालकांसह प्रवाशांनाही त्रास !
किनारी भागात स्थानिक टॅक्सी चालकांकडून इतर ठिकाणाहून प्रवासी नेण्यासाठी जाणाऱ्या टॅक्सीचा-लकांसह देशी व परदेशी पर्यटकांनाही त्रास देण्याचे प्रकार होत आहेत. पोलिसांत तक्रारी केलेल्या असल्यातरी प्रकार कमी झालेले नाहीत. कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी ऑल गोवा टुरिस्ट टॅक्सी युनिटी असोसिएशनकडून दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे.
---------------------------------
गुरूवार
* दुसर्‍याला चालवायला दिलेले २३ शॅक बंद; १५ दिवसांत हटवणार

शॅक धोरण २०२३-२६ चे उल्लंघन करून परस्पर दुस्यांना रॉक चालवण्याची परवानगी दिल्याबद्दल पर्यटन खात्याने २३ शेंकना फटकारले आहे. यूपीआ-यद्वारे पैसे कोणाच्या खात्यात गेले याचा शोध घेऊन २३ रॉक भाड्याने दिल्याचा शोध घेण्यात आला व त्यापैकी ६ रॉक परप्रांतीयांना चालवण्यासाठी दिल्याचे निष्पन्न झाले. सदर २३ रॉक बंद करून ते १५ दिवसांच्या आत पाडण्याचे आदेश पर्यटन खात्याने दिले आहेत.

 
* पर्वरीत क्रेनखाली सापडून दुचाकीस्वार ठार 
सुकूर, पर्वरी येथे जुन्या महिंद्रा शोरूम इमारतीसमोर भरधाव दुचाकी रस्त्यावर घसरली व झालेल्या अपघातात उड्डाणपुलाची कमान घेऊन जाणाऱ्या क्रेनच्या चाकाखाली सापडून विशाल काणकोणकर (२९, रा. नागाळी, ताळगाव) हा मोटारसायकलस्वार ठार झाला. हा अपघात सायं. ६च्य सुमारास घडला.

 
---------------------------------------------
शुक्रवार
* सीआरझेड क्षेत्रातील 351 हुन अधिक भू आराखड्यात फेरफार

अवैध बांधकामांना अभय देण्यासाठी सुमारे ३५१हून अधिक भू आराखड्यात बदल केल्याचे समोर आले. यातील ८० ते ९० टक्के बांधकामे सीआरझेडमधील असून सर्वाधिक ६० ते ७० टक्के बार्देश तालुक्यातील आहेत. अवैध कृत्य लक्षात आल्यानंतर आराखडे पूर्ववत केले आहेत; मात्र संबंधितांनी बांधकाम कायदेशीर करून घेतल्याचे समोर आले आहे.

 
* पूर्ववैमनस्यातून चाकू हल्ल्यात कुठ्ठाळी येथे कामगाराचा खून 
पूर्ववैमनस्यातून झाबोल-कुठ्ठाळी येथील सेंट अँथोनी चिकन फार्ममध्ये काम करणारा अनिल मुथामाझी (२१, ओडिशा) व झिहुसाया मोंडल (३९, ओडिशा) याच्यावर गुरुवारी (ता.२०) दुपारी चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये अनिल याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला तर झियुसाया याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार चालू आहे.

 
----------------------------------------------
शनिवार
* गोव्यातील बिहारवासीयांनी स्थानिक संस्कृतीचे अनुसरण करावे : मुख्यमंत्री

गोव्याची संस्कृती शांतताप्रिय आहे. गोव्यात कामासाठी येणाऱ्या बिहारवासीयांनी गोव्याच्या संस्कृतीचे, येथील सर्वधर्म समभाव विचारधारेचे अनुसरण करावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पणजीतील बिहार दिवस कार्यक्रमात केले.

 
* मिरामार येथील 'ओशानिया' इमारतीच्या फ्लॅटमध्ये लागली आग 
मिरामार, पणजी येथे व्हि. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयाजवळ असलेल्या 'ओशानिया' या इमारतीमधील गच्चीवर असलेल्या एका फ्लॅटला दुपारी २.११ बाजता आग लागली. पणजी अग्निशामक दलासह म्हापसा आणि पिळर्ण अग्निशामक दलास देखील पाचारण करण्यात आले. चार बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले
----------------------------------------------------
लक्षवेधीः-
* राज्यातील सध्याचे वीज मीटर बदलून त्यांच्या जागी स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी सरकारने डीजे स्मार्ट नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली आहे.
* प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नावे बनावट जाहिरात देऊन भारत तालुक्यातील एका एका वृद्ध महिलेला क्रिकेट आणि शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली 2.63 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला.
* सीआरझेड क्षेत्रात येणाऱ्या व कासव संवर्धन केंद्राला अडथळा ठरणाऱ्या 67 बांधकामांपैकी 24 बांधकामांना सील ठोकण्यात आले.
* गोवा ते बेळगाव आंतरराज्य मार्गावर चालणारी कर्नाटक सरकारची बस दारूच्या नशेत चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्या प्रकरणी आमचा पोलिसांनी संशयित गुरुलिंगप्पा नंदेन्नवर या चालकाला अटक केली.
* वेर्णा येथील ह्युज प्रेसिझन मॅगझिन या कंपनीच्या बेतूल नाकेरी येथील स्फोटकांच्या गोदामाला आग लागण्याची व स्फोट होण्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
* राज्यात यापुढे बेकायदा टाऊट्सना अद्दल घडविण्यासाठी येत्या विधानसभा अधिवेशनात कडक कायदा करून टाऊट्सना तडीपार करण्याचा विचार पर्यटन खाते करत आहे, अशी माहिती पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक यांनी दिली.
* पेडणे- केरी समुद्र किनारी विनापरवाना पॅराग्लायडिंग करणाऱ्या पुणे आणि मुंबईतील ८ जणांना तेरेखोल किनारी सुरक्षा पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी संबंधित पर्यटकांकडील साहित्यही जप्त करण्यात आले.