पुरातत्व खात्याची सूचना : चित्रीकरणासाठीही शुल्क
पणजी : राज्यातील सरकारी ताब्यातील संरक्षित स्मारकांच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे. अशा ठिकाणी प्रवेश करण्यासाठी १५ वर्षांवरील व्यक्तीला पूर्वी ५० पैसे दर होता. आता तो वाढवून ५० रुपये करण्यात आला आहे. असे असले तरी पुरातत्व खात्याचे संचालक ठराविक काळासाठी प्रवेश शुल्क माफ करण्याचे आदेश काढू शकतात. याबाबत खात्यातर्फे नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
पुरातत्व खात्याने १९८० मधील नियमात बदल सुचवणारी मसुदा अधिसूचना फेब्रुवारी महिन्यात जारी केली होती. यावर सूचना आणि आक्षेप मागवण्यात आले होते. मात्र ३० दिवसांत कोणतीही सूचना न आल्याने नवीन बदल अधिसूचित करण्यात आले आहेत. जुन्या नियमांनुसार संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. याबाबत केवळ खात्याच्या संचालकांची लेखी परवानगी घेऊन चित्रीकरण करता येत होते.
नव्या नियमांनुसार सरकारच्या ताब्यातील संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी दिवसाला २५ हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. यातील १० हजार रुपये सुरक्षा रक्कम म्हणून ठेवण्यात येईल. तर अन्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी १० हजार रुपये शुल्क आकारण्यात येईल. यातील २ हजार रुपये सुरक्षा रक्कम म्हणून जमा करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.
..........
चित्रीकरणाबाबतचे नियम न पाळल्यास दंड
- खात्याचे संचालक काही ठराविक काळासाठी कोणत्याही प्रकारच्या चित्रीकरणाला परवानगी नाकारू शकतात.
- चित्रीकरणासाठी अर्ज केल्यानंतर संचालक यामुळे संरक्षित वास्तूची हानी होणार नाही याची खात्री करूनच पुढील परवाने देतील.
- चित्रीकरणाबाबतचे नियम न पाळल्यास किंवा आवश्यक परवाना न घेतल्यास सरकारच्या ताब्यातील संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांसाठी ५० हजार रुपये, तर अन्य संरक्षित स्मारकांच्या जागी २० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.