-एकीकडे ४ जून रोजी देशातील अनेक राजकीय पक्षांच्या भवितव्याचा निकाल लागला तर दुसरीकडे नीट यूजी २०२४ च्या परीक्षेचाही निकाल लागला. दरम्यान एनटीएने जाहीर केलेल्या निकालात ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले आहेत. इतक्या जणांचे १०० टक्के गुण एकत्र पाहिल्यानंतर निकालाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच ६० ते ७० गुण ग्रेस मार्कच्या स्वरूपात देण्यात आल्यानेही अनेक शिक्षणतज्ञांनी एकंदरीत असेसमेंट प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे. सदर प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली असून सर्व याचिकांची एकत्रच सुनावणी केली जात आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एनटीएकडून दाखल झालेल्या याचिकांवर उत्तर मागितले आहे; मात्र समुपदेशनावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. वाचा सविस्तर
नवी दिल्ली : एनटीएने ४ जून रोजी देशातील प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर केला. निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांतच सोशल मीडियावर परीक्षा रद्द करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली. एनटीएने निकालात काहीतरी गडबड असल्याचा दावा अनेक विद्यार्थी आणि कोचिंग ऑपरेटर्सनी केला होता. त्यांच्या बाजूने समोर आलेल्या व्यक्तव्यानुसार , तब्बल ६७ विद्यार्थ्यांना परीक्षेत ७२० पैकी ७२० गुण मिळाले आहेत, याचमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. केवळ दोन विद्यार्थ्यांना ७१८ आणि ७१९ गुण मिळाले आहेत. ही गोष्ट अशक्य आहे, असा दावाही करण्यात आला. मात्र, एनटीएने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
दरम्यान एकंदरीत प्रकारावरून पालक-पाल्य- शिक्षक या सर्वांना मनस्ताप भोगावा लागला आहे. याच कारणांमुळे तब्बल २१९ याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या. न्यायालयात दाखल झालेल्या काही याचिकांमध्ये ५ मेच्या परीक्षेपासून प्रश्नपत्रिका फुटल्याच्या तक्रारी निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत तर काही याचिकांत मार्क असेसमेंटवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. १७ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली होती, मात्र निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली नव्हती. सदर प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली असून सर्व याचिकांची एकत्रच सुनावणी केली जात आहे. दरम्यान, एनटीएने घेतलेल्या निर्णयानुसार एक उच्चस्तरीय समिती विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या तक्रारींचे विश्लेषण करेल.
दरम्यान आज मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान समुपदेशनावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने विद्यार्थ्यांनाही धक्का बसला आहे . न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या सुट्टीतील खंडपीठाने एमबीबीएस, बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांच्या समुपदेशनाला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच परीक्षा रद्द करण्यासही त्यांनी नकार दिला.
याचिकाकर्त्यांतर्फे वकील मॅथ्यू जे नेदुमपारा यांनी समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती देण्याची विनंती खंडपीठाला केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार देत खटल्याच्या पुढील सुनावणीसाठी ८ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. मात्र परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर खंडपीठाने एनटीएला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने म्हटले की, परीक्षेच्या विश्वासहर्तेवर परिणाम झाला आहे, त्यामुळे एनटीएला उत्तर देणे अनिवार्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
दरम्यान; ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) रविवार, ५ मे रोजी घेतली होती. यावेळी सुमारे २४ लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते. परीक्षेचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला. एनटीएने जाहीर केलेल्या निकालात ६७ उमेदवारांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले आहेत. इतक्या उमेदवारांचे १०० टक्के गुण एकत्र पाहिल्यानंतर सोशल मीडियावर परीक्षेच्या निकालाबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. निकालात काहीतरी तफावत असू शकते, असे सांगण्यात आले. परीक्षेत इतका उच्चांकी कट ऑफ यापूर्वी कधीच झाला नसल्याचा दावाही करण्यात आला.
७१८ ७१९ गुणांबाबत शंका का ?
नीट परीक्षेत प्रत्येकी ४ गुणांचे १८० प्रश्न आहेत. म्हणजे एकूण ७२० गुणांचा पेपर आहे. उत्तर चुकीचे आढळल्यास १ गुण वजा केला जाईल. त्यामुळे एका प्रश्नाचे उत्तर चुकीचे असल्यास ७१५ गुण मिळतील. बरोबर उत्तरासाठी ४ गुण वजा केले जातील. महत्त्वाचे म्हणजे ७२० नंतर फक्त ७१६ किंवा ७१५च गुण मिळवता येतील. विद्यार्थ्याने एक प्रश्न अनुत्तरीत सोडल्यास त्यास ७१६ गुण मिळू शकतात. मुख्य म्हणजे परीक्षेच्या इतिहासात विद्यार्थ्याला ७१८ किंवा ७१९ गुण मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे, असा दावाही केला जात आहे. एनटीए परीक्षेत सामान्यीकरणाबद्दल बोलत आहे, परंतु त्यांच्या परीक्षेच्या माहितीपत्रकात असे काहीही नमूद केलेले नाही.
यंदाच्या परीक्षेबाबत सोशल मीडियावर अनेकांनी आपले म्हणणे मांडत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. जसे पहिल्यांदाच ६७ विद्यार्थ्यांनी ७२० पैकी ७२० गुण मिळवले आहेत. २०२३ च्या परीक्षेत केवळ २ विद्यार्थ्यांना ७२०/७२० गुण मिळाले होते. २०२२ मध्ये एकाही विद्यार्थ्याला इतके गुण मिळाले नाहीत. तर २०२१ मध्ये फक्त तीन विद्यार्थ्यांना ७२०/७२० गुण मिळाले होते. अशा स्थितीत ६७ विद्यार्थ्यांनी हा पराक्रम कसा काय साधला हा प्रश्न निर्माण झाला आहे.
समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार; एकाच केंद्रातून आलेल्या अनेक टॉपर्सनी हा पराक्रम केला आहे. परीक्षेत टॉप केलेल्या पहिल्या १०० विद्यार्थ्यांच्या यादीत एकच केंद्र असलेले ८ विद्यार्थी असल्याचा दावा केला जात आहे. यापैकी ६ विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. उर्वरित दोन विद्यार्थ्यांना ६८ वा आणि ६९ वा क्रमांक मिळाला आहे हे एकाच केंद्राचे विद्यार्थी असल्याचा दावा केला जात आहे. यातील ७ विद्यार्थ्यांचे आडनाव त्यांच्या नावापुढे लिहिलेले नसल्याचा दावाही केला जात आहे.यात काही तरी काळेबेरे आहे. दरम्यान; निर्धारित वेळेपूर्वीच एनटीएने नीट यूजीचा निकाल जाहीर केल्यानेही गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
एनटीएने काय स्पष्टीकरण दिले?
४ जून रोजी नीट यूजीचा परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून एनटीएला अनेक प्रश्न विचारले जात आहेत. नीट पेपर लीक प्रकरणाबाबत ४ जून रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. नीट परीक्षा २०२४ पुन्हा घेण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात ५ मे रोजी झालेल्या परीक्षेत पेपर फुटल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत पुन्हा परीक्षा घेण्याच्या सूचना द्याव्यात अशीही मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.
नीट यूजी २०२४ परीक्षेदरम्यान वेळेचा अपव्यय झाल्याबद्दल काही न्यायालयीन प्रकरणे एनटीएकडे आली होती. त्यानंतर १३ जून २०१८ च्या सामान्यीकरणाशी (नॉर्मलायजेशन) संबंधित आदेश सर्वोच्च न्यायालयाने लागू केला. परीक्षेदरम्यान अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला होता. काही जणांना चुकीचे पेपरही मिळाले होते. न्यायालयाच्या या आदेशाच्या आधारे अनेक उमेदवारांना ग्रेस गुण देण्यात आले. म्हणूनच त्याचे गुण ७१८ किंवा ७१९ आहेत.असे स्पष्टीकरण एनटीएने जारी केले आहे. दरम्यान याप्रकरणी अनेक शिक्षणतज्ञांनी आक्षेप घेतला असून ६०-७० ग्रेस मार्क हे कोणत्या आधारे देण्यात आले असे प्रश्न विचारले जात आहेत. याच कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांना ६६० गुण मिळाले त्यांना अतिरिक्त ७० मार्क ग्रेस मार्कच्या स्वरूपात मिळाल्याने आपसूकच त्यांचे एकूण गुण ७२० भरले. यामुळेच तब्बल ६७ विद्यार्थ्यांना परीक्षेत ७२० पैकी ७२० गुण मिळाले आहेत. एका माहितीनुसार तब्बल १५०० विद्यार्थ्यांना ग्रेसमार्क देण्यात आले होते.
दरम्यान; अब्दुल्ला मोहम्मद फैज आणि डॉ शेख रोशन मोहिदिन यांनी नीट परीक्षेच्या निकालाबाबत याचिका दाखल केली आहे. ते तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत आणि या राज्यांतील विद्यार्थ्यांसाठी काम करतात. त्यांच्या याचिकेनुसार, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ग्रेस गुणांमागे कोणतेही परिभाषित तर्क नाही. मुख्य म्हणजे ग्रेस गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. याचिकेत एनटीएच्या आन्सर कीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. १३,००० हून अधिक विद्यार्थ्यांनीही आन्सरकीला आव्हान दिले आहे.