निकालाच्या विश्लेषणाची गरज

बारावीच्या परीक्षेला बसलेल्या १७,५११ विद्यार्थ्यांपैकी सुमारे २,६०० विद्यार्थी नापास झाले आहेत. हा आकडा प्रचंड मोठा आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये तर निकालाची टक्केवारी चांगली होती. त्यामुळे यावर्षी नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या चिंताजनक आहे.

Story: अग्रलेख | |
23rd April, 12:33 am
निकालाच्या विश्लेषणाची गरज

कोविडच्या काळात शालान्त मंडळाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थांना सूट दिली. २०२१ मध्ये तर न भूतो न भविष्यति असा निकाल लागला. बारावीत ९९.४० टक्के तर दहावीचा निकाल ९९.७२ टक्के निकाल लागला होता. निकालाची ती परंपरा २०२२ मध्येही काही प्रमाणात राहिली. त्यावर्षी दहावीचा निकाल ९२.७७ टक्के तर बारावीचा निकाल ९२.६६ टक्के लागला होता. कोविडनंतर गेल्यावर्षी ९० टक्क्यांपेक्षा जास्त निकाल लागले. यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला. बहुतेक वेळा होते, तसे यावेळीही झाले. मुलींनी निकालात बाजी मारली. जवळजवळ सात टक्क्यांच्या आसपास मुली पुढे आहेत. गेल्या नऊ वर्षांतील सर्वांत कमी निकालही याच वर्षीचा लागला आहे. २०१८ मध्ये ८५.५५ टक्के निकाल लागला होता. यावर्षीचा निकाल ८४.९९ टक्के एवढा आहे. २०२१ ते २०२३ पर्यंतच्या निकालांना फाटा देत यंदा इतका कमी निकाल लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. बारावीच्या निकालाचे विश्लेषण शिक्षण खाते, शालान्त मंडळ आणि सर्व उच्च माध्यमिक शाळांनाही करावे लागेल. सोबतच पालकांनीही या निकालाचे विश्लेषण करण्याची गरज आहे. 

शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी निकालावेळी केलेले विधान सध्या बरेच चर्चेत आहे. लोकांच्या उलट सुलट प्रतिक्रिया त्यावर येत आहेत. अध्यक्षांच्या म्हणण्याप्रमाणे राज्यातील शिक्षक चांगले काम करतात. विद्यार्थी अभ्यासात कमी पडतात. कष्ट करण्याची तयारी नसल्यामुळे तसेच विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वापर वाढल्यामुळे निकाल कमी लागला. विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वापर वाढवल्याच्या अनेक तक्रारी आपल्याकडे आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या गॅझेट्समुळे विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येत नाही, असे म्हणत शेट्ये यांनी विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या गॅझेट्स वापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. निकाल ज्या पद्धतीने गेल्या नऊ वर्षांत घसरला आहे ते पाहता, हा विषय चिंता करण्यासारखाच आहे. विद्यार्थ्यांना अगदी कमी किमतीत मिळणारा इंटरनेट डेटा, फेसबुक, इन्स्टा, यूट्यूबचा असलेला प्रभाव, व्हाट्सएपचे विस्तारलेले जाळे या सगळ्यामुळे विद्यार्थी पुस्तकांपासून दूर चालला आहे, हे नाकारता येणार नाही. अगदी लहान मुलांनाही मोबाईलमध्ये यूट्यूब आणि रिल्सचे व्यसन जडलेले आहे. शाळकरी मुलांपासून कॉलेजच्या मुलांपर्यंत सगळ्यांनाच मोबाईल जवळचा झाल्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे शेट्ये यांनी नोंदवलेले निरीक्षण खोटे नाही. शालान्त मंडळाच्या काही बैठकांमध्येही विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठीचे प्रस्ताव आले होते. कालांतराने त्या प्रस्तावांची अंमलबजावणी झाली नाही. प्रत्येक शिक्षण संस्थेत विद्यार्थी वाचन मंडळ स्थापन करून विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची गोडी निर्माण करण्यासाठीचा प्रस्ताव चार वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. मोबाईलचा वापर जरी वाढला असला तरी पुस्तकांविषयी आवड निर्माण करणे आणि वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये रहावी यासाठी उपक्रम राबवणे गरजेचे आहे. मंडळाचे माजी सदस्य डॉ. नंदकुमार कामत यांनी वाचन मंडळाची संकल्पना मांडली होती, ती मार्गी लागली नाही. मंडळाच्या अध्यक्षांनी व्यक्त केलेली चिंता गांभीर्याने घेण्याची तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात रुची यावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

बार्देशमधील एका प्रसिद्ध महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी हजेरी पूर्ण केली नाही म्हणून त्यांना परीक्षेला बसू दिलेले नाही. असे प्रकार तर आज कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत. बारावीची परीक्षा ही महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात होते. जर बारावीच्या परीक्षेचा निकाल एवढा कमी लागत असेल तर सध्याच्या घडीला खरी सुधारणा दहावी, बारावीच्याच वर्गातून करावी लागेल. शाळांमधील शिस्तीवर लक्ष द्यावे लागेल. मोबाईल आता प्रत्येक विद्यार्थ्याकडे आहे. त्यामुळे त्याचा वापर मर्यादित करणे, अभ्यासक्रम डिजिटल करणे, शिक्षण पद्धतीला आधुनिक शिक्षणाची जोड देणे अशा गोष्टी काळानुरूप कराव्या लागतील, अन्यथा यापुढे याहीपेक्षा मोठी समस्या निर्माण होऊ शकते. बारावीच्या परीक्षेला बसलेल्या १७,५११ विद्यार्थ्यांपैकी सुमारे २,६०० विद्यार्थी नापास झाले आहेत. हा आकडा प्रचंड मोठा आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये तर निकालाची टक्केवारी चांगली होती. त्यामुळे यावर्षी नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या चिंताजनक आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांमध्ये निकालाची टक्केवारी सुधारत असताना यंदा अचानक निकालात आलेली तफावत ही आश्चर्यकारक आहे. या निकालानंतर शालान्त मंडळ, शिक्षण खाते विश्लेषण करतील, अशी अपेक्षा आहे.