बॉलिवूड रॅपरला लोकसभेची उमेदवारी

Story: राज्यरंग | |
23rd April, 12:31 am
बॉलिवूड रॅपरला लोकसभेची उमेदवारी

हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जननायक जनता पक्षाने (जेजेपी) बॉलिवूड रॅपर राहुल यादव (फाजिलपुरिया) याला गुरुग्राम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. पाच वेळा खासदार आणि भाजपचे दिग्गज नेते असलेले राव इंद्रजीत सिंह यांच्याशी त्याची थेट लढत असणार आहे. गुरुग्राममध्ये २५ मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

राहुल यादव ‘चुल’ या रॅप गाण्याने प्रसिद्ध झाला होता. यानंतर दोन वर्षांनंतर, हेच गाणे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि आलिया भट्ट अभिनीत ‘कपूर अँड सन्स’ या चित्रपटासाठी चित्रित करण्यात आले. तेव्हापासून फाजिलपुरिया बॉलीवूडमध्ये त्याच्या रॅप गाण्यांसाठी प्रसिद्ध झाला. त्याने आतापर्यंत अनेक गाणी आणि संगीत अल्बम प्रदर्शित केले आहेत.

राहुल यादव याचा १० एप्रिल १९९० मध्ये जन्म झाला. त्याने गुडगावमधून बी.टेक.चे शिक्षण पूर्ण केले. यादव याने हिंदी आणि हरियाणवीसह विविध भाषांमध्ये अनेक हिट गाणी आणि अल्बम प्रदर्शित केले आहेत. ‘मस्ती माई’, ‘बिल्लो रानी’ आणि ‘हाय रेटेड गब्रू’सारखी गाणी त्याने गायिली आहेत. ‘खामोशियां’ आणि ‘मस्तीजादे’सह अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी त्याने संगीतही दिले आहे. फाजिलपुरिया त्याच्या जीवनशैलीसाठी ओळखला जातो. तो हमर आणि लॅम्बोर्गिनीसारख्या गाड्यांमध्ये फिरतो. आलिशान जीवनशैली जगत असताना तो अनेकदा वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे.

सन २०२३ मध्ये ‘बिग बॉस ओटीटी’ विजेता एल्विश यादववर सापाच्या विषाचा वापर करणाऱ्या रेव्ह पार्टीचे आयोजन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान त्याने सापांची व्यवस्था फाजिलपुरिया याने केल्याचे म्हटले होते. परंतु, फाजिलपुरिया याने हे सर्व दावे फेटाळले होते. आपला रेव्ह पार्टीमध्ये कोणताही सहभाग नसल्याचे त्याने सांगितले होते. सापांची व्यवस्था त्याच्या प्रॉडक्शन टीमने केवळ एक व्हिडिओ शूटसाठी केली असल्याचे त्याने स्पष्ट केले होते. या प्रकरणात त्याला जामीन मिळाला आहे.

मेनका गांधी यांच्या पीपल फॉर अॅनिमल्स या संस्थेबरोबर काम करणाऱ्या गुप्ता यांनी त्यांच्या याचिकेत आरोप केला आहे की, ‘बिग बॉस ओटीटी २’ चे विजेते आणि इतर ५० जण एका व्हायरल म्युझिक व्हिडिओमध्ये विविध सापांचा वापर करताना दिसत आहेत. हे वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ चे उल्लंघन आहे. त्यामुळे यादव याच्या अडचणी वाढल्या आहेत. 

राहुल यादव अनेक प्रकरणांमध्ये अडकला असला तरी तरुणांमध्ये तो लोकप्रिय आहे. तसेच अनेक सामाजिक कार्यामध्ये त्याचा सहभाग आहे. त्यामुळे जेजेपी पक्षाने त्याला तिकीट दिले असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. यादव पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय चौटाला यांच्या संपर्कात आला. यानंतर २०२० मध्ये जेजेपीमध्ये तो सामील झाला. रॅपर म्हणून नाव कमावल्यानंतर राहुल यादव राजकारणात कोणता करिश्मा करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रसन्ना कोचरेकर, (लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उपसंपादक आहेत.)