साहित्य मंडळाचे नामधारी 'सेवक'!

सुमारे शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या या संस्थेच्या मागील काही वर्षांतील कार्यावर मंडळाचे जुने सदस्य पोटतिडिकीने बोलताना दिसतात हे खरे असले, तरी या संस्थेला गतवैभव मिळवून द्यायचे असेल तर कोणी तरी निग्रह करून त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज होती. प्रसिद्ध कवयित्री डॉ. अनुजा जोशी यांच्या रूपाने का होईना अशा मक्तेदारीविरुद्ध आवाज उठवला गेला, त्यास दाद द्यावीच लागेल.

Story: विचारचक्र | |
23rd April, 12:30 am

गोमंतक साहित्य सेवक मंडळ या सुमारे ९६ वर्षे जुन्या संस्थेची पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी निवडण्याकरिता येत्या २७ एप्रिल रोजी घेतली जाणारी निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सध्या गटांगळ्या खात आहे आणि संस्थेचा एकतंत्री - एकमंत्री कारभार पाहता असे होणे अगदीच अनपेक्षित नव्हते. साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर हे आपली नौका सह'सेवकां'सह कशीबशी पैलतिरी नेण्याकरता जीवाचे रान करत असले तरी त्यांच्या एकतंत्री कारभारास आव्हान देऊन कोणीतरी निवडणूक रिंगणात आपलीही हॅट टाकावी हे नसे थोडके, असेच म्हणावे लागेल. गोमंतक मराठी साहित्य सेवक मंडळ या संस्थेला तसा गौरवशाली असा इतिहास असून बा. द. सातोस्करांपासून माधव गडकरी, वामन राधाकृष्ण, दत्ता सराफ, नारायण आठवले यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषवताना या संस्थेचे कार्य एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम केले, पण काळाच्या ओघात या संस्थेचा मूळ उद्देश बाजूला फेकला गेला आणि संस्थेची परवड सुरू झाली. केवळ मिरवण्यासाठीच अध्यक्ष आणि अन्य पदांचा वापर होऊ लागला आणि हे ‘संस्थान’ आपल्या हातातून अन्य कोणाच्या हातात जाऊ नये यासाठीच प्रयत्न होत गेले. मागील निवडणुकीत या मंडळाला त्यात यश आल्याने यावेळीही तोच प्रयोग पुढे नेऊन ही संस्था बिनविरोध हायजॅक करण्याचे मनसुबे रचले गेले. पण दुर्दैव असे की अध्यक्ष आणि अन्य एक दोन पदांसाठी काही सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या मंडळाचे गणित काही अंशी निश्चितच बिघडले आहे.

सुमारे शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या या संस्थेच्या मागील काही वर्षांतील कार्यावर मंडळाचे जुने सदस्य पोटतिडिकीने बोलताना दिसतात हे खरे असले, तरी या संस्थेला गतवैभव मिळवून द्यायचे असेल तर कोणी तरी निग्रह करून त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज होती आणि प्रसिद्ध कवयित्री डॉ. अनुजा जोशी यांच्या रूपाने का होईना अशा मक्तेदारीविरुद्ध आवाज उठवला गेला, त्यास दाद द्यावीच लागेल. आमचे मित्र रमेश वंसकर यांना आमचा विरोध आहे अशातला भाग नाही, परंतु मागील काही वर्षे मंडळाचा चालू असलेला कारभार त्रयस्थ नजरेतून पाहता त्यावर कोणी समाधानी असेल असे म्हणता येणार नाही. 'हम करे सो कायदा' या न्यायाने गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे कार्य मागील तीन वर्षे चालू आहे आणि ते करताना संस्था ही अखेर तिच्या घटनेनुसार चालवावी लागते, नियमानुसार सगळे काम पुढे नेण्याची अध्यक्षांची जबाबदारी असते. पण तीन वर्षे आमसभा बोलावणे नाही, कार्यकारी मंडळाच्या बैठका होणे नाही, मंडळाच्या सदस्यांपर्यंत हिशेबाचा वार्षिक ताळेबंद पोचवणे नाही, याचा संताप अनेक सदस्य व्यक्त करताना दिसतात आणि त्याचे पडसाद २७ एप्रिलच्या बैठकीत उमटले जाण्याचे संकेत मिळतात. मंडळाच्या २२८ सदस्यांची लांबलचक यादी असताना वार्षिक आमसभा केवळ तीस-चाळीस लोकांच्या क्षमतेच्या सभागृहात अध्यक्ष कशी बोलावू शकतात, असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केल्याने त्यास 'फिक्सिंग'चा वास आला तर नाके मुरडण्याची गरज नाही. आमसभेसाठी सदस्य येणारच नाहीत आणि आपले 'सेवक' तेवढे मतदान करून जातील हेच अध्यक्षांना अभिप्रेत आहे का? याचेही उत्तर यावेळी कदाचित त्यांना द्यावे लागेल.

गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम संस्थेच्या प्रत्येक सदस्यांपर्यंत वेळीच म्हणजे किमान पंधरा दिवस आधी पोचवण्याची जबाबदारी अध्यक्षांवर असताना आपण खोगीरभरती केलेल्या नामधारी सदस्यांपर्यंतच तो पोचवण्याचे काम झाले, अशीही अनेक सदस्यांची तक्रार आहे आणि त्यात बरेच तथ्य दिसून येते. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी मोजक्याच सदस्यांच्या वॉटसॅपवर हा कार्यक्रम गेल्याची तक्रार आहे. एकाही दैनिकातून याबाबत वेळीच निवडणुकीची बातमी प्रसिद्ध न करण्यामागे अध्यक्षांचा छुपा अजेंडाच अधिक ठळकपणे दिसून येतो, असेही काही जण सांगतात.  आजच्या डिजिटल युगात खरे म्हणजे सदस्यांना कोणतीही तक्रार करण्यास वाव देणे हे एक प्रकारचे अपयशच ठरते, पण सुमारे शंभर वर्षे जुन्या असलेल्या या साहित्यिक संस्थेला डिजिटल पर्वाचे वा तंत्रज्ञानाचे पूर्णपणे वावडे असावे, याला काय म्हणावे? संस्थेच्या सभागृहासाठी भाडे आकारले जाते आणि हे भाडे रोखीने घेताना संबंधित व्यक्तीकडून साधी पावतीही जर दिली जात नाही, तर शंभर वर्षांच्या या संस्थेची कशी परवड चालू आहे, हेही लक्षात येते. गोवा मराठी पत्रकार संघाच्या सभेच्या आयोजनासाठी सभागृह आरक्षित करण्याकरिता त्या व्यक्तीकडे गेलो, तर रोखीने पैसे देण्याची अट त्याने प्रथम ऐकवली. मंडळाच्या बँक खात्यात भाड्याची रक्कम ट्रान्स्फर करण्याची तयारी दाखवली, तर तसे कोणतेही खाते नसल्याचे मला सुनावण्यात आले. नेमकी रक्कम रोखीने दिली तर रितसर पावतीही मिळाली नाही, याला काय म्हणावे? अखिल गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या नुकत्याच काणकोणला केलेल्या आयोजनानंतरही आजच्या बदलत्या युगात डिजिटल बँकिंगपासून दूर राहू पाहणाऱ्या या शंभरेक वर्षांच्या संस्थेत परिवर्तन घडवून आणण्याची गरज आहे आणि त्यासाठी उदासीनता झटकून सामोरे जावे लागेल.

गोमंतक साहित्य सेवक मंडळ लवकरच आपली शतकपूर्ती करणार आहे. काल परवा स्थापन झालेल्या संस्थाही बदलत्या डिजिटल युगाबरोबर पुढे जात असताना गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे स्वतःचे संकेतस्थळ नसावे, ही तर दुर्दैवी बाब आहेच. पण त्याचबरोबरच मंडळाकडे साधा 'इमेल आयडी' नसावा यातूनच या जुन्या आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या संस्थेचा एकविसाव्या शतकात बैलगाडीतून होणारा प्रवास कोणाच्याही लक्षात यावा. साहित्याशी दुरान्वयेही कोणताही संबंध नसलेल्या आपल्या गोतावळ्यातील लोकांची मंडळाचे सदस्य म्हणून अध्यक्षांनी केलेली खोगीरभरती, हाही मंडळाच्या साहित्याशी संबंध असलेल्या जुन्या सदस्यांमध्ये चर्चेचा एक विषय आहे आणि साहित्य मंडळाच्या या नामधारी सदस्यांच्या भरवशावरच आपली नौका सह'सेवकां'सह पैलतिरी पोचवणे हाच सध्याच्या मंडळाचा एक कलमी कार्यक्रम दिसतो. विठ्ठल गावस आणि राजमोहन शेट्ये हे तर बिनविरोध निवडून आले आहेतच, आता अन्य पाच सहा जुन्याच साथीदारांसह अध्यक्षांना पुढील तीन वर्षे मिरवायचे आहे. काही जुनी खोडेही त्यात दिसतात. बुजुर्ग संस्थेच्या नावाने वैयक्तिक लौकिक लाभाचे व्यवहार चालू असल्याचे जे आरोप केले जातात त्यातही तथ्य नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता तर मुळीच दिसत नाही. २७ एप्रिल रोजी पर्वरी येथे दिवसभराचे मराठी राजभाषा साहित्य संमेलन होणार असताना त्याच दिवशी आमसभेचे आयोजन आणि निवडणुकीचा कार्यक्रम ठेवणे, हाही सध्याच्या कार्यकारी मंडळाच्या छुप्या अजेंडाचा भाग नसावा असे म्हणता येणार नाही. मराठी पत्रकार आणि साहित्यिकांनी आता उदासीनता झटकून आपल्या या संस्था मार्गी लावणे, ही काळाची गरज आहे.

वामन प्रभू
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत)           
मो. ९८२३१९६३५९