पावसाळ्यात पणजीकरांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह !

उत्तर गोवा

Story: अंतरंग |
22nd April, 05:57 am
पावसाळ्यात पणजीकरांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह !

शनिवार २० एप्रिल रोजी धुंवाधार पावसाने पणजीला झोडपून काढले. नेमेची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. रस्ते पाण्याखाली गेले. वाहतुकीचा खोळंबा झाला. १८ जून रस्त्यावरील काही दुकानांतही पाणी शिरले. अर्थात कमी वेळात धुंवाधार पाऊस पडणे आणि रस्ते पाण्याखाली जाणे, ही बाब पणजीकरांना नवी नाही. दरवेळी जोरदार पाऊस झाल्यावर शहर जणू बुडतेच. मात्र यावेळी स्मार्ट सिटीच्या कामांमुळे पणजीची आणि पर्यायाने पणजीकरांची अवस्था अधिकच खराब झाली. 

शनिवारी पहाटे पणजीसह राज्यात सर्वत्र ढग जमू लागले. सकाळी काही काळ पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सकाळी दहानंतर पावसाचा जोर वाढला. दहा ते पावणे अकराच्या दरम्यान पावसाने पणजीला अक्षरशः झोडपून काढले. सुमारे दोन तासात ३.३१ इंच पावसाची नोंद झाली. आणि या पहिल्याच पावसात पंचवीस वर्षांची गॅरंटी असणाऱ्या स्मार्ट सिटीच्या कामाचा खरा दर्जा उघडा पडला. स्मार्ट सिटीच्या नियोजनशून्य कामांमुळे पणजीच्या बुडतीत भर पडली. १८ जून रस्ता, दयानंद बांदोडकर रस्ता, डॉ. आत्माराम बोरकर रस्ता आदी रस्ते पाण्याखाली गेले. भाटले, सांतिनेज, मिरामार परिसर, टोंक भागातील काही परिसर, कदंब बसस्थानक परिसर जलमय झाले.

शनिवारच्या पावसात पणजीत याआधी पाऊस पडल्यावर ज्या ठिकाणी पाणी साचत नव्हते असे काही रस्ते देखील जलमय झाले. स्मार्ट सिटीची कामे सुरू असलेला परिसर चिखलमय झाला. आधीच वैतागलेल्या पणजीकरांची या परिसरातून प्रवास करताना चांगलीच दमछाक झाली. याविषयीचे  व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होऊ लागले. यानंतर कदाचित महापालिका प्रशासनाला जाग आली. महापालिका कर्मचाऱ्यांनी पाणी साचून राहिलेल्या रस्त्यांवरील ड्रेनेज साफ करून पाण्याचा  निचरा केला. महापौर रोहित मोन्सेरात यांनी कामाची पाहणी केली. त्यांनी बुडलेल्या पणजीसाठी स्मार्ट सिटीला जबाबदार ठरवले. 

महानगरपालिका प्रशासनाने याआधीच पणजीतील ड्रेनेज साफ केले होते. मात्र स्मार्ट सिटीच्या कामांमुळे तयार होणारी माती आणि धूळ पुन्हा ड्रेनेजमध्ये जाऊन ते पुन्हा भरल्याचे महापौर मोन्सेरात यांनी सांगितले. ड्रेनेजबाबत एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊनही पणजी बुडायची तशी बुडलीच. स्मार्ट सिटीने रस्ते बांधले, मात्र अपवाद वगळता अजून बहुतेक ठिकाणी ड्रेनेज जोडणी झालेली नाही. एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस येतो किंवा कामांमुळे ड्रेनेज पुन्हा भरू शकतात हे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना माहिती नसणे हे शक्य नाही. असे असले तरी नेहमीप्रमाणे स्मार्ट सिटीने याबाबत कोणतेच भाष्य केले नाही. महापालिकेचे कर्मचारी पाण्यात उतरून काम करत असताना काही अभियंत्यांचा अपवाद वगळता स्मार्ट सिटीचे अधिकारी कुठेच दिसले नाहीत. स्मार्ट सिटीच्या कामांबाबत त्यांच्या सीईओंनी याआधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मला लोक काय म्हणतात त्याची काळजी नाही' असे त्यांनी सांगितले होते. लोकप्रतिनिधी 'अंडी, ऑमलेट, पाऊस, इंद्रधनुष्य' असली वक्तव्ये करण्यात धन्यता मानतात. विरोधक परिस्थितीचा फायदा घेऊन स्वतःची पोळी भाजत आहेत. एकाच पावसात पणजीची अवस्था दयनीय झाली. कितीही दावे केले तरी ३१ मे पर्यंत स्मार्ट सिटीची कामे संपण्याची शक्यता नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर पणजीची अवस्था आणखीनच बिकट होणार आहे. पणजीला कोणी वाली उरलेला नाही. त्यामुळे आता पणजीकरांनी स्वतःच्या जबाबदारीवरच घराबाहेर पडणे आणि स्मार्ट कामातून स्वतःचा सुरक्षित ठेवणे हाच एकमेव उपाय शिल्लक आहे.

पिनाक कल्लोळी