...असे भक्त अगदीच विरळा !

सोsहं भावाने जे बळावलेत (म्हणजे जे ध्यान-धारणेत बऱ्यापैकी प्रगत झालेत) ते वैराग्यसंपन्न हातांनी मायेच्या या दुष्कर अशा दुस्तर नदीचे पाणी सहजरित्या व प्रभावीपणे कापत कापत शेवटी अनायासे मुक्तीच्या काठाला लागतात! अशारीतीने अर्जुना, जे स्वतःचे समर्पण सर्वतोपरी माझ्यात करतात, ते ही माझी माया लीलया तरून जातात. पण या जगात असे भक्त फारसे आढळून येत नाहीत. आढळतात ते अगदीच विरळा!

Story: विचारचक्र |
22nd April, 06:55 am
...असे भक्त अगदीच विरळा !

या माया-रूपी नदीमध्ये रती-सुखाची बेटे असतात. त्या बेटांवर कामाच्या लाटा आदळत असतात. विविध जीव-रूपी उदंड फेस तिथे अखंड साचलेला दिसतो. त्या प्रवाहाच्या अहंकार-रूपी धारेमध्ये विद्या, धन आणि कुल हे मदाचे मीन उसळून येताना दिसतात. त्यांच्यावर एकावर एक क्षणोक्षणी विषयांच्या लाटा उड्या घेतात. उदयास्त-रूपी लोंढे जन्म-मरणाचे खळगे पाडत पुढे जात असतात. पंचभूतात्मक देहरूपी किती तरी बुडबुडे तिथे येत आणि जात असतात. त्यात संमोहाचे (म्हणजे अविवेकाचे) आणि विभ्रमाचे (म्हणजे गोंधळाचे) मासे धैर्यरूपी आमिषे गिळत असतात. त्यांच्याभोवती जिथे तिथे अज्ञानाचे वक्रगती भोवरे गिरक्या घेत असतात. त्या नदीमधले भ्रान्तिरूप पाणी अती गढूळ झाल्याने जीव त्यात फसतात. ते आस्थेच्या गाळात रुतून व्यर्थच स्वर्गप्राप्तीची अपेक्षा करतात. रजोगुण कसा तिथे खळाळत वाहतो आणि स्वर्गलोक गाजायला लागतो. तमाच्या प्रवाहधारा जोरदार वाहतात. तसेच सत्वाचे गंभीर स्थिरपणही जाणवते. अशी ही माया नदी अत्यंत द्वाड आहे आणि ती तरून जाणे हे जड जिवांना अत्यंत दुष्कर आहे. म्हणजे ती तरून जाण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही जीवांना यश मिळत नाही. ते संपतात. म्हणजे मरून जातात. पण तेवढ्यावर सगळे संपते कुठे? त्या जीवांच्या अंतर्मनात अहंकार जो ठासून भरलेला असतो त्यानुसार कर्मे करून त्यांनी जे प्रारब्ध निर्माण करून ठेवलेले असते, त्यानुसार सत्यलोकात जाऊन त्याच्या मजबूत सीमा बनून राहिलेले व त्यांचा पुण्य-क्षय झाल्याने जे तिथून ढासळतात ते; नरकात जाऊन नरक-यातना भोगून पापक्षय झालेले जे असतात ते आणि त्या दोन्ही ठिकाणी न जाता फक्त ब्रह्मकर्म करण्यासाठीच ज्या जीवांची (मानव देह सोडल्यावर) नियुक्ती झालेली असते ते असे सगळे जीव पुनर्जन्म घेतात. तो घेताना त्यांना ब्रह्मांडाच्याच घनीभूत झालेल्या पंचमहाभूतांचा आधार घ्यावा लागतो. त्या अर्थाने त्या पुनर्जन्माच्या प्रक्रियेत ब्रह्मांडाचे धोंडे कोसळायला लागतात. ते सगळे या त्रिगुणमयी मायेच्या नदीत प्रवेशतात.

आपल्याच बुध्दीच्या बळावर तरून जाऊ अशा गुर्मीत जे असतात, त्यांचा ठावठिकाणाही उरत नाही (म्हणजे ते जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातच फिरत राहतात). आम्ही झालो आता ज्ञानी, असा गर्व जे करतात ते त्या डोहात बुडून जातात. तीन वेदांची सांगड बांधून बरोबर अहंकाराचा धोंडा घेऊन जे कोणी तरून जातात त्यांना मद-रूपी मासे गिळून टाकतात. तारुण्याची कंबर कसून जे कोणी मदनाच्या वाटेला जातात, त्यांना शेवटी विषय-रूपी मगरी जबड्यात धरून चघळून खातात. त्याव्यतिरिक्त त्यातूनही सुटलेले जीव वार्धक्याच्या लाटेमध्ये मतिभ्रंश-रूपी जे पाश असतात त्यात अडकून चारही बाजूंनी जखडून जातात. शोकाच्या काठावर आदळत, क्रोधाच्या भोवऱ्यात गिरक्या घेत राहतात. तिथून वर आल्यावर त्यांना संकटांची गिधाडे कोचायला लागतात आणि शेवटी दु:खाच्या चिखलाने माखलेले ते जीव मृत्यूच्या वाळूमध्ये रुतून बसतात. अशारितीने हे अर्जुना, 'कामा'च्या नादी लागल्याने जन्मूनही जीव वाया जातात.

जे यज्ञयागादिकक्रिया-रूप पेटी पोटाला बांधून ही नदी तरून जाण्यासाठी तीत उतरतात, ते स्वर्गसुखाच्या कपारीत गुरफटून राहतात. जे आपल्या बाहुबलावर विश्वास ठेवून कर्म करून मोक्ष गाठण्याच्या फंदात पडतात ते विधिनिषेधाच्या भोवऱ्यात अडकून अखंड फिरत राहतात. वैराग्याच्या नावेचा जिथे शिरकावच नसतो, तसेच जिथे विवेकही शोधून सापडत नाही, तिथे ती महानदी तरण्यास अर्जुना, एखादेवेळेस यदाकदाचित योगमार्ग उपयोगी पडू शकतो.

आता मनुष्यमात्रात जे काही बळ असते, त्यासवे ती दुष्कर मायानदी कशी ओलांडायची ते सांगतो. असे बघ की, जो पथ्य पाळत नाही (म्हणजे कुपथ्य करतो) तो कधी व्याधीला जिंकू शकेल का? किंवा दुर्जनाची बुध्दी कधी सज्जनाला कळू शकेल का? किंवा मिळालेली संपत्ती लोभी मनुष्याला सोडवून जाववेल का? मासा कधी गळ गिळू शकेल का? एकत्र असलेले सक्षम लोक चोराला घाबरतील काय? कधी पिशाच्च भित्र्या माणसाच्या आधीन होईल का? जाळ्यात सापडलेले हरणाचे पाडस ते जाळे तोडू शकेल का? मुंगी मेरू पर्वत ओलांडील काय? नाही! तसेच कामुक मनुष्य स्त्रीला जिंकू शकत नाही. तद्वतच ही दुस्तर मायामय नदी जड जीवांना तरून जाता येत नाही. मात्र जे सर्व भावांनी मला भजतात, ते ही मायानदी सहजपणे पार करू शकतात. त्यांच्यासाठी ऐल-थडी असतानाच माया-जळ हे संपलेले असते. ज्यांच्यासमोर सद्गुरू-रूपी तारक नावाडी नि:शंकपणे उभा असतो व जे आत्मस्वरूपाच्या अनुभूतीची कौपीन कसून ही दुष्कर नदी पोहून ओलांडायला तयार होतात आणि ज्यांना अत्यंत परिणामकारक असा आत्मनिवेदनाचा तराफा सापडलेला असतो ते अहंतेचा भार दूर फेकून देऊन, विकल्पाची धार चुकवून, प्रपंचप्रीतीच्या ओहोटीची नीट खात्री करून घेऊन, ऐक्याचा उतार शोधून, बोधाची सांगड जोडून मग या प्रवृत्तीच्या ऐल तिरावरून निवृत्तीच्या पैल तिराकडे कसे झेपावत निघतात. (आत्मनिवेदन म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी स्वतःला वाहून घेणे; आत्मसमर्पण; नवविधा भक्तीतील शेवटची. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे नऊ प्रकार.)

सोsहंभावाने जे बळावलेत (म्हणजे जे ध्यान-धारणेत बऱ्यापैकी प्रगत झालेत) ते वैराग्यसंपन्न हातांनी मायेच्या या दुष्कर अशा दुस्तर नदीचे पाणी सहजरित्या व प्रभावीपणे कापत कापत शेवटी अनायासे मुक्तीच्या काठाला लागतात. अशारीतीने, अर्जुना, जे स्वतःचे समर्पण सर्वतोपरी माझ्यात करतात, ते ही माझी माया लीलया तरून जातात. पण या जगात असे भक्त फारसे आढळून येत नाहीत. आढळतात ते अगदीच विरळा!


मिलिंद कारखानीस, (लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.) मो. ९४२३८८९७६३