केजरीवाल यांना तुरुंगात मारण्याचा कट... आपचा गंभीर आरोप

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19th April, 03:06 pm
केजरीवाल यांना तुरुंगात मारण्याचा कट... आपचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला आहे, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अरविंद केजरीवाल हे तीन दशकांपासून मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी इन्सुलिन अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, त्यांना इन्सुलिन दिले जात नाही. याविरोधात निवडणूक आयोग आणि राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असून संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करणार आहे, असे सिंह यांनी म्हटले आहे.

मी तुरुंगात होतो आणि एक दिवस तारखेनुसार न्यायालयात आलो होतो. तेव्हा मी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात कट रचला जात असल्याचे वक्तव्य केले होते. माझ्या विधानावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. मी अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबासाठी संपूर्ण जबाबदारीने आणि काळजीने सांगत आहे की केजरीवाल यांच्या विरोधात एक कट रचला जात आहे. तुरुंगात त्यांच्यासोबत काहीही होऊ शकते. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात आहे, असेही खासदार संजय सिंह यांनी म्हटले आहे.

ईडी आणि तुरुंग अधिकाऱ्यांनी माध्यमांमध्ये दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवण्याचा कट रचला आहे. तुरुंगात असलेल्या कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक माहिती अशा प्रकारे पसरवली जाऊ शकत नाही. केजरीवाल हे गेल्या ३० वर्षांपासून मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी इन्सुलिन हे अत्यंत महत्त्वाचे आहे, ते जीवनरक्षक औषध आहे. जर ते वेळेवर उपलब्ध झाले नाही तर, रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या जीवाशी खेळ केला जात आहे, केजरीवाल यांना इन्सुलिन दिले जात नाही, असा आरोपही संजय सिंह यांनी केला आहे.

हेही वाचा