ढवळीकर बंधू असेपर्यंत नवोदितांनी मगोपमध्ये जाऊ नये : नरेश सावळ

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th February, 12:28 am
ढवळीकर बंधू असेपर्यंत नवोदितांनी मगोपमध्ये जाऊ नये : नरेश सावळ

पणजी : ढवळीकर बंधूंच्या हातात मगोप आहे तोपर्यंत नवोदित राजकारण्यांनी या पक्षात जाऊ नये. त्यांनी अन्य कोणत्याही पक्षात जावे. मगोपमध्ये गेल्यास ढवळीकर बंधू त्यांचा घात करतील, असा आरोप माजी आमदार नरेश सावळ यांनी केला. मंगळवारी त्यांनी पणजीत माध्यमांशी संवाद साधला.
नरेश सावळ म्हणाले की, गोव्यातील तरुणांनी, नवोदित राजकारण्यांनी स्वतंत्रपणे लढावे किंवा पर्याय नसल्यास राजकारण करू नये. मात्र, चुकूनही मगोपमध्ये जाऊ नये. मगोपमध्ये गेल्यास ढवळीकर बंधूच त्यांना राजकारणातून संपवतील. ते कधीही निवडून येणार नाहीत याची काळजी ढवळीकर बंधू घेतील. मी मगोप सोडल्यावर ढवळीकर बंधूंनी मला शुभेच्छा दिल्या. कारण त्यांना माहिती होते की चूक त्यांची आहे.
मगोप पक्षाला आजही भाऊसाहेब बांदोडकरांच्या नावावर मते मिळतात. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजपला वर काढले. त्यांनी निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना वाऱ्यावर सोडले नाही. त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन पक्ष मोठा केला. मी पक्षात असताना गोव्यात फिरून पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला परवानगी देण्यात आली नाही. सध्याच्या मगोपच्या नेत्यांनी पक्ष रसातळाला नेला.
सावळ म्हणाले, म्हादई प्रश्नी एका अर्थाने ढवळीकर बंधू देखील जबाबदार आहेत. ते काँग्रेससोबत असताना याबाबत भाजपवर टीका करत होते. आता ते भाजपमध्ये गेल्यावर काँग्रेसवर टीका करत आहेत. दोन्ही सरकारात ते होते. ढवळीकर बंधूंचा हा स्वभाव सगळ्या गोव्याला माहित आहे.

लोकांना भेटून लोकसभेबाबत निर्णय
येत्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यातून लढण्याचे आमचे नक्की झाले आहे. याबाबत तयारीही सुरू झाली आहे. आम्ही याविषयी लोकांसोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार आहोत, असे नरेश सावळ यांनी सांगितले.