स्थानिकांच्या हितासाठी नवे शॅक धोरण !

पर्यटनमंत्री रोहन खंवटे : किनारपट्टी व्यवस्थापन आराखड्याला देणार प्राधान्य

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th March 2023, 12:08 am
स्थानिकांच्या हितासाठी नवे शॅक धोरण !

पणजी : शॅक व्यवसाय हा गोमंतकीयांचा व्यवसाय आहे. शॅक व्यवसायात गोमंतकीयांचे हीत जपण्यासाठी सरकार नवे शॅक धोरण तयार करणार आहे. उत्तर गोवा तसेच दक्षिण गोव्यात आदर्श शॅक असतील. शॅक धोरणासह एकत्रित किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा तयार केला जाईल, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले. 

आमदार वीरेश बोरकार यांच्या लक्षवेधी सूचनेवर सभागृहात बराच वेळ चर्चा झाली. आमदार विजय सरदेसाई, मायकल लोबो, अालेक्स सिक्वेरा, एल्टन डिकॉस्टा यांनी चर्चेत भाग घेतला. कोविडा काळात पर्यटन व्यवसाय ठप्प होता. याचा शॅक व्यवसायाला फटको बसला. यामुळेच सरकारने शॅकधारकांना शुल्कात सवलत दिली. सवलत देण्याची शॅकमालकांची मागणी होती. शॅक व्यवसाय हा गोमंतकीयांचा व्यवसाय आहे. शॅक व्यवसायात गोमंतकीयांचे हीत जपण्यासाठी सरकार नवे शॅक धोरण तयार करणार आहे.  शॅकधारकांनी बेकायदा गोष्टींना थारा देऊ नये. उत्तर आणि दक्षिण गोव्यात आदर्श शॅक्सची उभारणी केली जाईल. आदर्श शॅक धोरण तयार करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. मात्र आदर्श शॅक धोरणाची अद्याप कार्यवाही झालेली नाही.

कचरा व्यवस्थापनासह किनारपट्टी सुरक्षेसाठी एकत्रित किनारपट्टी व्यवस्थापन धोरण तयार केले जाईल. हे धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे मंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले. 

नळजोडणीसह सांडपाणी वाहिनी सरकारने उपलब्ध करून द्यायला हवी. पर्यटनासाठी शॅक व्यवसाय टिकून राहणे गरजेचे आहे. या व्यवसायामुळे रोजगारनिर्मिती होते. शॅकवाल्यांच्या मागण्यांवर 

सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा. त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या, अशी मागणी आमदार वेंझी व्हिएगस यांनी केली.

मायकल लोबोंच्या विधानावरून गदारोळ 

शॅक घालण्यासाठी काळे कपडे घालून काही लोक गोव्यात भेटीगाठी घ्यायला येतात, असा आरोप मायकल लोबो यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाला. त्या लोकांची नावे सांगा, अशी मागणी आमदारांनी केली. किनारपट्टीवर शॅक व्यवसाय १९७०च्या दशकापासून सुरू आहे. शॅक धोरण तसेच किनारपट्टी व्यवस्थापनाची चर्चा २०१२पासून सुरू आहे. बस, टॅक्सी व्यवसायाप्रमाणे शॅक व्यवसाय गोमंतकीयांच्याच हातात राहायला हवा, असे मायकल लोबो म्हणाले. मायकल लोबोंच्या विधानावर बोलताना आलेक्स सिक्वेरा म्हणाले, आग लागल्याशिवाय धूर येत नाही. त्यामुळे मायकल यांच्या आरोपात तथ्य असू शकते. विजय सरदेसाई म्हणाले, मायकल यांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी.