बार्देशच्या आणखी चार पंचायतींत अंशतः लॉकडाऊन

आस्थापने सुरू ठेवल्यास व्यवसाय परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित


06th May 2021, 12:59 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : करोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी बार्देश तालुक्यातील थिवी, सिरसई, ओशेल शिवोली व सडये शिवोली या पंचायतींनी गावात लॉकडाऊन जाहीर केला आहे. तालुक्यातील ३३ पैकी २४ पंचायतींनी गावात अंशतः लॉकडाऊन लागू केला आहे.
तालुक्यातील अनेक भाग करोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहेत. थिवीच्या सरपंच शर्मिला गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीत दि. ६ ते दि. १५ मेपर्यंत गावात अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिरसई, ओशेल शिवोली व सडये शिवोली पंचायतींनीही दि. ६ ते दि. १६ मेदरम्यान लॉकडाऊनचा निर्णय घेतला. या काळात सकाळी ६ ते दुपारी १ पर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील. दवाखाने व फार्मसी पूर्ण वेळ सुरू राहतील. आदेशाचे उल्लंघन करून आस्थापने सुरू ठेवल्यास व्यवसाय परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल. तसेच एक हजार रुपये दंड केला जाईल, असेही या पंचायतींनी स्पष्ट केले आहे.