हेरगिरीबद्दल तिघांना अटक

महिला, पुरुषासह एका पत्रकाराचा समावेश


20th September 2020, 12:33 am
हेरगिरीबद्दल तिघांना अटक

हेरगिरीप्रकरणी अटक करण्यात आलेले तिघे संशयित.

नवी दिल्ली : भारत व चीन दरम्यान तणाव वाढलेला असताना दिल्ली पोलिसांनी एका मुक्त पत्रकारास चीनसाठी हेरगिरी केल्याबद्दल अटक केली आहे. या पत्रकाराबरोबरच एक महिला व अन्य एक पुरुषासदेखील पोलिसांनी अटक केली आहे.

दिल्लीमधील पीतमपुरा भागातील रहिवासी असलेले राजीव शर्मा मुक्त पत्रकार आहेत. राजीव शर्मा यांच्या घरातून पोलिसांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित अनेक गोपनीय कागदपत्रे हस्तगत केली आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने राजीव शर्मा यांना अधिकृत गोपनीयता कायद्यांतर्गत अटक करून, पुढील तपास सुरू केला आहे. सध्या न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी चौकशी व तपासाच्या आधारावर दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, पत्रकार राजीव शर्मा यांनी चिनी गुप्तचर संस्थांना देशाच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका चिनी महिलेसह तिच्या नेपाळी सहकार्‍यासही कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसा पुरवल्याप्रकरणी अटक केली असून, त्यांचीदेखील चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल राजीव शर्मा यांच्या फोन कॉल्सवर लक्ष ठेवून होती. शिवाय, त्यांचे कॉल डिटेल्सदेखील गोळा करत होती. अटकेनंतर न्यायालयाने शर्मा यांची सहा दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.