सहकारी सोसायट्यांतून सोने तारण कर्ज शक्य

- सहकार खात्याने बंदी उठवली

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
17th September 2020, 09:37 pm
सहकारी सोसायट्यांतून सोने तारण कर्ज शक्य

पणजी : सहकारी क्रेडीट सोसायट्यांमध्ये सोने गहाण ठेवून कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर बंदी घालण्यात आली होती. ती आता मागे घेण्यात आली आहे. या संदर्भातील पत्रक सहकार निबंधकांनी जारी केले आहे. 

सोने गहाण ठेवून कर्ज घेण्याच्या प्रक्रियेतून गैरप्रकार उघडकीस येत असल्याने सरकारने बंदी घातली होती. त्यानंतर आता सोने तारण कर्ज देण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. सहकारी सोसायट्यांचे व्यवस्थापन सुरळीत चालावे, यासाठी सोने तारण कर्जावर ६ जुलै २०१७ला घातलेली बंदी आता उठविण्यात आली असल्याचे सहकार खात्याने नमूद केले आहे. 

मार्गदर्शक तत्वांनुसार सहकारी सोयायट्यांमधून जास्तीत जास्त पाच लाखांपर्यंत सोने तारण कर्ज देता येईल. सोन्याच्या एकूण मुल्यापैकी ८० टक्के रक्कम कर्ज स्वरुपात देता येईल. सोन्याचा दर्जा ठरविण्यासाठी तज्ज्ञाची नेमणूक करणे आवश्यक आहे, असेही सहकार खात्याने आदेशात म्हटले आहे.