पर्सेप्टचा ‘सनबर्न फॉर गोवा’ उपक्रम

- राज्यासाठी निधी संकलन करणार; २९ रोजी लाईव्ह सादरीकरण

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
16th August 2020, 07:53 pm
पर्सेप्टचा ‘सनबर्न फॉर गोवा’ उपक्रम

पणजी : अशियातील सर्वांत मोठा इलेक्ट्रॉनिक डान्स-म्युझिक फेस्टिवल असलेल्या सनबर्न ब्रँडची कंपनी असलेल्या पर्सेप्ट लाइव्हने गोव्याला पुरस्कृत करण्यासाठी तसेच गोवा राज्यासाठी कोविड मदत निधी संकलन करण्याच्या उद्देशाने सनबर्न फॉर गोवा हा व्हर्चुअल संगीत महोत्सव आयोजित करण्याची घोषणा केली आहे. २९ ऑगस्ट २०२० रोजी हा महोत्सव लाइव्ह सादर होणार असून, यामध्ये जगातील क्रमांक १चा डीजे डीव्हीएलएम याच्यासह अनेक नामांकित कलाकार संगीतप्रेमींना मुग्ध करणार आहेत.
या उपक्रमातून संकलित होणारा सर्व निधी ‘मुख्यमंत्री मदत निधी-गोवा’स दिला जाणार आहे.
कोविड-१९ महामारीने साऱ्या जगास ग्रासले असून त्याचा सर्वच उद्योग क्षेत्रांना मोठा तर पर्यटन उद्योग क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. जगातील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये गणल्या जाणाऱ्या गोवा राज्यातील पर्यटन, वाहतूक, हॉटेल, अन्न उत्पादने, विमान सेवा तसेच इतर निगडित लघू व्यवसायांवर मोठे संकट कोसळले आहे. २००७ साली गोव्यातूनच सनबर्नला प्रारंभ झाला होता. आजवरच्या प्रवासात जगातील प्रमुख तीन म्युझिक फेस्टिवलमध्ये सनबर्नने स्थान पटकावले असून याद्वारे जागतिक डान्स-म्युझिक क्षेत्राच्या नकाशात गोव्यास ठळक स्थान देण्यात यश मिळवले आहे. गत १३ वर्षांत डिसेंबरमध्ये होणाऱ्या सनबर्न गोवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी ५१हून अधिक देशांतील २० लाखांपेक्षा अधिक लोक गोव्यात आलेले आहेत.
गत दशकभरातील गोव्याशी जुळलेल्या या संबंधातून या निसर्गरम्य राज्यास आणि कोविड-१९ महामारीविरोधात अथकपणे प्रयत्न करत असलेल्या प्रशासनास या स्थितीत काही आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने उद्देशाने या संगीत महोत्सवाच्या व्यासपीठाच्या माध्यमातून पर्सेप्ट लाइव्हने या उपक्रमाची संकल्पना आखली. ‘सनबर्न फॉर गोवा’ या सीएसआर उपक्रमासाठी जगातील अव्वल क्रमांकाचा डीजे डीव्हीएलएम, जगातील सर्वांत मोठा सोशल मीडिया ब्रँड फेसबुक आणि अशियातील सर्वांत मोठा संगीत महोत्सव असलेला सनबर्न एकत्र आले आहेत. या उपक्रमातून संकलित झालेला सर्व निधी मुख्यमंत्री कोविड मदत निधी-गोवाला दिला जाणार असून त्याचा वापर गोवा राज्यातील कोविड-१९विषयक मदतकार्यास केला जाणार आहे.
जागतिक पातळीवर निधी संकलनासाठी ‘सनबर्न फॉर गोवा’चे २९ ऑगस्ट रोजी जगातील लक्षावधी लोकांना जोडला गेलेला व सर्वांत मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सनबर्नच्या फेसबुक पेजवर थेट प्रक्षेपण होणार आहे. ‘सनबर्न फॉर गोवा’च्या फेसबुक पेजवर डोनेट बटणच्या माध्यमातून लोकांना या कार्यासाठी थेट मदत करून आपला खारीचा वाटा उचलता येणार आहेच, त्याचबरोबर मनोरंजनाचा सुखद अनुभवही घेता येणार आहे.


सनबर्नने एका विधायक उपक्रमाचे आयोजन केले आहे. गोवा आणि सनबर्नवर प्रेम करणारे लोक सढळ हस्ते या उपक्रमास हातभार लावतील. संपूर्ण जगाचे गोव्यात स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत.
- मनोहर आजगावकर, पर्यटनमंत्री