शिगाव-कुळे येथील प्रकार : वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याबद्दल संताप

फोंडा : कुळे पंचायत क्षेत्रात बुधवारी सकाळी एकाच घरातील दोन भावांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे कुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात कुळे बाजारात एका युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर संतप्त लोकांनी आरोग्य केंद्राजवळ धडक दिली होती. आरोग्य केंद्र जवळ असते तर बुधवारी एका भावाचा तरी जीव वाचला असता, असे नागरिकांनी सांगितले.
बुधवारी सकाळी शिगाव-कुळे येथील उमाकांत वेळीप (५८) यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी कुटुंबीयांनी त्याला इस्पितळात दाखल करण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला फोन करून माहिती दिली. कुळे बाजारात झालेल्या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला १०८ रुग्णवाहिकेतून इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यामुळे शिगाव येथील रुग्णाला नेण्यासाठी कुडचडे येथील रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली. पण रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत उमाकांत वेळीप यांचा मृत्यू झाला. बंधू मृत झाल्याचे समजताचा ज्येष्ठ बंधू संतोष वेळीप (६५) यांनाही हृदयविकाराचा झटका आला. एका खासगी वाहनातून संतोष वेळीप यांना हॉस्पितळात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेत कुडचडेहून आलेली रुग्णवाहिका सापडली. अर्ध्या वाटेवर रुग्णवाहिका सापडल्यानंतर संतोष वेळीप यांना रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही भावांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने कुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू असते तर एखादा तरी जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले असते, अशी प्रतिक्रिया स्थानिक लोकांकडून व्यक्त होत आहे.
कुळे बाजारात गेल्या काही दिवसांंपूर्वी एका युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक लोकांनी कुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम गेल्या आठ वर्षांपासून रखडल्यामुळे संताप व्यक्त करीत परिसरात दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. बुधवारी सकाळी दुर्दैवी घटना घडल्याने स्थानिकांतून पुन्हा तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
उमाकांत यांच्या मुलाला ब्रेन स्ट्रोक...
शिगाव गावात दुर्दैवी घटना घडल्यानंतर संपूर्ण गाव शोककळेत पसरला. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, उमाकांत वेळीप यांच्या पोलीस कर्मचारी असलेल्या मुलाला १५ दिवसांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. मुलाच्या चिंतेत असल्याने उमाकांत वेळीप यांना हृदयविकाराचा झटका आल्याची चर्चा सुरू आहे. संध्याकाळी दोन्ही मृतदेहांवर स्थानिक स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.