दोनापावलातील दुर्घटना : दुचाकीचालक गंभीर जखमी, कारचालकाला अटक

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दोनापावला येथील मणिपाल रुग्णालयाजवळ रविवारी रात्री अतिवेगवान ‘मिनी कूपर’ या आलिशान कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दीक्षा पारवाडकर (२३, मूळ रा. कर्नाटक) हिचा जागीच मृत्यू झाला. मोटरसायकल चालक डी. अरुण (रा. मडगाव, मूळ चेन्नई) गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पणजी पोलिसांनी कारचालक डॅरियस डायस (२२, रा. चिकोळणा, बोगमाळो-वास्को) याला अटक केली आहे.
दीक्षा पारवाडकर आणि डी. अरुण दोनापावला येथील ‘हॉटेल सिदादी गोवा’मध्ये कार्यरत होते. पिवळ्या रंगाची ‘मिनी कूपर’ कार अत्यंत वेगाने जात होती. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील दोघेही हवेत फेकले जाऊन रस्त्यावर आदळले. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. दीक्षाला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. अरुण याच्या डोक्याला आणि पायाला मोठी इजा झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सोमवारी शवचिकित्सेनंतर दीक्षाचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार समीर नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. पोलीस उपनिरीक्षक महादेव पेडणेकर यांनी कारचालक डॅरियस डायस (२२, रा. चिकोळणा, बोगमाळो-वास्को) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. नुकसानग्रस्त वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. चालकाने मद्यप्राशन केले होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.
दीक्षाच्या अकाली जाण्याने जगलबेटवर दुःखाचा डोंगर
जोयडा तालुक्यातील जगलबेट येथील रहिवासी दीक्षाच्या मृत्यूमुळे जगलबेट गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दीक्षा चार वर्षांपूर्वी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेण्यासाठी गोव्यात गेली होती. कोर्स पूर्ण करून एक वर्षापासून ती हॉटेलमध्ये काम करत होती. तिने दहावीपर्यंतचे शिक्षण जगलबेट येथे, तर बारावीपर्यंतचे शिक्षण खानापूर येथे घेतले. गोव्यात जाऊन तिने तीन वर्षे हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती कायमस्वरूपी नोकरीला लागली होती. तिच्या अकाली निधनामुळे गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. जगलबेट येथे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. तिचे वडील गोव्यात गवंडी काम करत असून, भाऊ खासगी कंपनीत आहे.