ड्रग्ज प्रकरणी उत्तराखंडच्या नागरिकाला अमेरिकेत ५ वर्षांचा तुरुंगवास; १५ कोटी डॉलर जप्त

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th April, 11:25 am
ड्रग्ज प्रकरणी उत्तराखंडच्या नागरिकाला अमेरिकेत ५ वर्षांचा तुरुंगवास; १५ कोटी डॉलर जप्त

न्यूयॉर्क : अमेरिकेतील ‘डार्क वेब मार्केटप्लेस’ (US Dark Web Marketplace) या संकेतस्थळावरून ड्रग्ज रॅकेट चालवल्या प्रकरणी भारतीय नागरिकाला ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शिवाय त्याचे १५ कोटी अमेरिकन डॉलर्सही जप्त करण्याचे आदेश तेथील न्यायालयाने दिले आहेत. या आरोपीचे नाव बनमीत सिंग (४०) असून तो उत्तराखंडच्या हल्द्वानी येथील रहिवासी आहे.

बनमीत सिंगला अमेरिकेच्या आवाहनावर एप्रिल २०१९ मध्ये लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. मार्च २०२३ मध्ये त्याचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यात आले होते. ड्रग्ज व्यवसाय चालवणे आणि पैसे उकळण्याचा कट रचणे या प्रकरणात त्याला जानेवारीमध्ये दोषी ठरवण्यात आले होते.


उत्तराखंडमधील हल्दवानी येथील बनमीत सिंग याने Fentanyl, LSD, Ecstasy, Xanax, Ketamine आणि Tramadol यासह बंदी असलेल्या ड्रग्जची विक्री करण्यासाठी डार्क वेब मार्केटप्लेसवर मार्केटिंग साइट तयार केल्या. ग्राहकांनी या साइट्सचा वापर करून आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे भरून बनमीतकडून ड्रग्ज विकत घेतले. त्यानंतर सिंग याने स्वतः यूएस मेल किंवा इतर शिपिंग सेवांद्वारे औषधे युरोपमधून अमेरिकेत पाठवण्याची व्यवस्था केली, असे न्यायालयीन दस्तऐवजात नमूद करण्यात आले आहे.

२०१२ ते जुलै २०१७ या कालावधीत बनमीत सिंगने युनायटेड स्टेट्समध्ये किमान आठ विक्री केंद्रे चालवली. त्यामध्ये ओहायो, फ्लोरिडा, नॉर्थ कॅरोलिना, मेरीलँड, न्यूयॉर्क, नॉर्थ डकोटा आणि वॉशिंग्टन यामधील तस्करांचा समावेश आहे. या तस्करांना प्रथम ड्रग्ज मिळाले. त्यानंतर त्यांनी सर्व ५० राज्ये, कॅनडा, इंग्लंड, आयर्लंड, जमैका, स्कॉटलंड आणि यूएस व्हर्जिन आयलंडमधील ठिकाणी ते ड्रग्ज वितरीत केले, असेही न्यायालयाच्या दस्तावेजात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा