Goan Varta News Ad

रेखाज हाऊस ऑफ कॉटनतर्फे ३७ विद्यार्थ्यांना मोबाईल संच

- केपे-मळकर्णे येथील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी मदत

Story: पणजी : |
09th September 2020, 12:40 Hrs
रेखाज हाऊस ऑफ कॉटनतर्फे ३७ विद्यार्थ्यांना मोबाईल संच

पणजी : सध्याच्या करोना महामारीच्या काळात सामाजिक पातळीवर विविध घटकांना बहुमोल साह्य करणार्‍या ‘रेखाज हाऊस ऑफ कॉटन’ या गोव्यातील ख्यातनाम आस्थापनाने शिक्षण क्षेत्रासाठीही भरीव योगदान दिले आहे. केपे - कळकर्णे येथील सरकारी विद्यालयातील गरजू ३७ विद्यार्थ्यांना नुकतेच डिजिटल शिक्षणासाठी उपयुक्त असे अद्ययावत मोबाईल संच  देऊ केले आहेत. या पार्श्वभूमीवर रेखाजचे संचालक माघव गुप्ता यांच्या दातृत्वाचे कौतुक होत आहे. 

सध्या करोना काळात शाळा बंद आहेत. ऑनलाईन क्लास, क्रमिक शिक्षण सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर रेखाज हाऊज ऑफ कॉटन या आस्थापनेने केलेली मदत विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण ठरणार आहे. 

म्हणून मळकर्णे विद्यालय 

मोबाईल संच देण्यासाठी मळकर्णे येथील सरकारी विद्यालयाचीच का निवड केली, असे विचारले असता रेखाजचे संचालक गुप्ता म्हणाले, नुकत्याच झालेल्या शिक्षकदिनी मळकर्णे येथील मुख्याध्यापिका सिंधु प्रभुदेसाई नायक यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवले. तेव्हा आपण त्यांना तुमच्या शाळेला काय मदत देेता येईल, असे विचारले. 

विदारक अनुुभव अन...

तेव्हा त्यांनी डिजिटल शिक्षणासाठी मोबाईल खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून एका विद्यार्थिनीने कानातली सोन्याची आभूषणे विकली, असा विदारक अनुभव सांगितला. त्यानंतर आपण त्या शाळेतील गरजू अशा ३७ मुला-मुलींना मोबाईल संच भेट स्वरुपात दिले. रेखाज हाऊसच्या या दातृत्वाबाबत शिक्षक, पालक यांनी आभार मानले आहेत. 

रेेखाज हाऊस ऑफ कॉटन या अग्रगण्य आस्थापनेतर्फे सध्या पीपीई कीट, मास्क, चादरी, पिले, बेडशीट तसेच अन्य कापडाची दर्जेदार उत्पादने बनविण्यात येतात. 

जेव्हा-जेव्हा सामाजिक पातळीवर संकटे उभी राहिली, तेव्हा-तेव्हा आम्ही मदतीसाठी तत्पर असतो आणि याहीपुढे राहू. 

माघव गुप्ता, रेखाज हाऊस ऑफ कॉटनचे संचालक. 

काही कोटींचे साह्य 

दरम्यान, रेखाज हाऊसचे शैक्षणिक क्षेत्रात केवळ गोव्यात योगदान नसून, अन्य राज्यांतही २०० मोबाईल संच, ६० लॅपटॉप दिले आहेत. त्याचप्रमाणे कोविड वॉरियर्सना साह्य, तसेच दक्षिण गोव्यातील कचरा उचलणार्‍या कर्मचार्‍यांसाठी रेखाज हाऊसने गेल्या आठवड्यात ३०० पीपीई कीटस, २ हजार एन -९५ मास्क, ८०० पीपी गाऊन मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. या शिवाय नेहमीच सामाजिक पातळीवर, हॉस्पिटल्सना त्यांनी वेळोवेळी भरीव साह्य केले आहे. गेल्या काही महिन्यांत रेखाज हाऊसतर्फे काही कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.