कॅन्सरच्या रुग्णाने दिला कोविडशी लढा

मुंबईतील जसलोक रुग्णालयात बोन मॅरोचेही यशस्वी प्रत्यारोपण


02nd August 2020, 05:28 pm
कॅन्सरच्या रुग्णाने दिला कोविडशी लढा

मुंबई : कोविड-१९ विषाणूच्या संसर्गातून मुक्त झालेल्या एका कॅन्सरग्रस्त रुग्णावर मुंबईतील सुप्रसिद्ध जसलोक रुग्णालयात यशस्वीरित्या ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’ करण्यात आले असून रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे. यामुळे आरोग्य सेवा क्षेत्रात जसपाल रुग्णालयाचा वेगळा ठसा उमटला आहे. ‘बोन मॅरो’ प्रत्यारोपणाच्या मदतीने अशाप्रकारे पहिल्यांदाच रुग्णाचे प्राण वाचल्याबद्दल रुग्णालय व्यवस्थापनाने समाधान व्यक्त केले आहे.
मुंबईत केमिस्टचा व्यवसाय करणाऱ्या ३० वर्षीय रुग्णाच्या रक्तातील पांढऱ्या पेशी वाढल्याचे आढळून आले होते. त्याच्या सर्व चाचण्या केल्यानंतर बोन मॅरोमध्ये ‘अॅक्युट मायलॉइड ल्युकेमिया’चे (एएमएल) निदान झाले. रुग्णाला फेब्रुवारी २०२० च्या पहिल्या आठवड्यात डोनोरुबिसिन अँड सायटाराबिनसह (७+३) इंडक्शन किमोथेरपी देण्यात आली. त्यानंतर रुग्णाचा बोन मॅरो पूर्णपणे रेमिशनमध्ये होता. त्यानंतर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्णाला कन्सोलिडेशन किमोथेरपी देण्यात आली. त्यानंतर रुग्णाला ‘अॅलोजेनिक बोन मॅरो प्रत्यारोपण’चा सल्ला देण्यात आला. यासाठी त्याच्या बहिणीनेच रक्तदान केले होते.
‘अॅलोजेनिक बोन मॅरो प्रत्यारोपण’ ही प्रक्रिया एप्रिलमध्ये करण्यात येणार होती. मात्र, याच कालावधीत रक्तदाता आणि रुग्ण या दोघांना कोविडची बाधा झाल्याचे चाचणीतून समोर आले. त्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्यांना वरळीतील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. हे उपचार ११ मेपर्यंत चालू होते. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. ९ जून रोजी कोविडची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णाला पुन्हा जसपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. लगेच दुसऱ्या दिवशी जसलोक रुग्णालयातील कन्सल्टण्ट मेडिकल आँकोलॉजिस्ट डॉ. महबूब बसाडे यांनी संपूर्ण भूल देऊन ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णावर हिकमन कॅथेटर इन्सर्शन प्रक्रिया केली. त्यानंतर त्याच्यावर टप्प्याटप्प्याने पुढच्या प्रक्रिया करण्यात आल्या. रुग्णावर अखेरीस २० जून रोजी बोन मॅरो प्रत्यारोपण प्रक्रिया पार पडली. डॉ. महबूब बसाडे आणि त्यांचे सहकारी डॉ. फहाद अफझल यांनी ही प्रक्रिया केली. तीन आठवड्यात रुग्ण हळूहळू बरा झाला. प्रकृती सुधारल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले.