
पेडणे: उत्तर गोव्यातील शांत समुद्रकिनारे सध्या एका रशियन पर्यटकाच्या क्रूर कृत्याने हादरले आहेत. मोरजी आणि हरमल भागात दोन रशियन महिलांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आलेक्सी लिओनोव्ह याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. हे केवळ खून नसून त्यामागे प्रेमसंबंध, अविश्वास आणि पैशांचा हव्यास असल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणाचा घटनाक्रम एखाद्या थरारपटासारखा आहे. हरमल येथील बामणभाटी भागात एका भाड्याच्या खोलीत ३७ वर्षीय एलिना या महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. त्याच दिवशी मोरजी येथील मधला वाडा येथे दुसऱ्या एका रशियन महिलेची बाथरूममध्ये नग्नावस्थेत हत्या झाल्याचे उघड झाले. मांद्रे पोलिसांनी संशयित आलेक्सीला तातडीने बेड्या ठोकल्या.
संशयिताची कार्यपद्धती (Modus Operandi) अत्यंत भयानक होती. तो सुरुवातीला रशियन महिलांशी मैत्री करून त्यांचे प्रेम संपादन करायचा. एकदा का महिलेचा विश्वास बसला की, तो तिच्याकडून मोठ्या रकमांची मागणी करत असे. जर महिलेने पैसे देण्यास नकार दिला किंवा तिचे दुसऱ्या कोणाशी संबंध असल्याचा संशय आला, तर तो विश्वासाने तिला जवळ घेऊन, हात बांधून तिच्यावर शारीरिक अत्याचार करायचा आणि नंतर गळा चिरून तिची निर्घृण हत्या करायचा, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
या क्रूर खुनांमुळे स्थानिक घरमालक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मांद्रे पोलीस स्थानकात भेट देऊन तपासाचा आढावा घेतला आहे.
प्रकरणाबाबत कमालीची गुप्तता, हिमाचल पोलिसांशी संपर्क
पोलिसांनी या प्रकरणाबाबत बाहेर काही वाच्छता करू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. हे प्रकरण हायफ्रोफाईल होऊ शकते. संशयिताने सांगितलेल्या गोष्टी खऱ्या निघाल्या तर पोलिसांची नाचक्की होऊ शकते म्हणूनच गेले दोन दिवस पोलिसांनी या प्रकरणी अंतर्गत स्तरावर वेगाने तपास सुरू ठेवला आहे. हिमाचल प्रदेशमधील पोलिसांशीही गोवा पोलीस याबाबत चर्चा करत आहे.
पोलीस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक संशयिताच्या गुन्हेगारी इतिहासाचा खोलवर तपास करत आहे. हा रशियन पर्यटक नेमका 'सायको किलर' आहे का आणि त्याने गोव्यात आणखी कोणाचे बळी घेतले आहेत का, या प्रश्नांच्या उत्तरासाठी पोलीस शांत डोक्याने पुराव्यांची साखळी जोडत आहेत. मात्र तपासादरम्यान त्याने पोलिसांनाही चक्रावून सोडले आहे. तो वारंवार आपली जबानी बदलत असून, त्याने केवळ दोनच नव्हे तर आणखी काही हत्या केल्या असण्याची दाट शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.