देव बोडगेश्वर पावला! सेवामुदतवाढ मिळाली; सहाय्यक अभियंत्याकडून देवाच्या चरणी सुवर्णहार अर्पण

पहा व्हिडिओ

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
देव बोडगेश्वर पावला! सेवामुदतवाढ मिळाली; सहाय्यक अभियंत्याकडून देवाच्या चरणी सुवर्णहार अर्पण

म्हापसा: भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणून ख्याती असलेल्या म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वराचा महिमा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या रश्मी मयेकर यांनी आपली मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत देवाच्या चरणी सोन्याचा हार अर्पण केला आहे. या श्रद्धेच्या कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.





मूळच्या पर्वरी येथील असलेल्या आणि सध्या डिचोलीत वास्तव्यास असलेल्या रश्मी मयेकर यांची लहानपणापासूनच श्री देव बोडगेश्वरावर अढळ श्रद्धा आहे. नोकरीत अजून सेवा करण्याची इच्छा असल्याने, त्यांनी एक वर्षाची सेवामुदतवाढ मिळावी यासाठी बोडगेश्वराच्या चरणी मनोभावे साकडे घातले होते. त्यांचे हे साकडे फळास आले असून, शासनाकडून त्यांना सेवामुदतवाढ मंजूर झाली आहे. आपली इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांनी म्हापसा येथील जत्रोत्सवाचे औचित्य साधून देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देवाला सोन्याचा हार अर्पण करून नवस फेडला.




यावेळी बोलताना रश्मी मयेकर यांनी सांगितले की, त्या दरवर्षी जत्रेला सहकुटुंब दर्शनासाठी येतात आणि त्यांचा या जागृत देवस्थानावर पूर्ण विश्वास आहे. यंदाचा ९१ वा जत्रोत्सव आणि मंदिर वर्धापन दिन उत्साहात साजरा होत असतानाच त्यांच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आला आहे. म्हापशाच्या या प्रसिद्ध जत्रोत्सवाची सुरुवात २ जानेवारी २०२६ रोजी झाली. हजारो भाविकांनी बोडगेश्वराचे दर्शन घेतले. श्रद्धेच्या या अनोख्या प्रत्ययामुळे श्री देव बोडगेश्वराच्या अफाट महतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.



हेही वाचा