आरजीच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आरजीच्या कार्यकर्त्यांना धमकावल्याची तक्रार केल्यानंतर जुने गोवा पोलिसांनी चिंबलचे पंच शंकर नाईक यांना मंगळवारी प्रतिबंधात्मक अटक केली. आरजीचे प्रमुख मनोज परब, आमदार वीरेश बोरकर आणि कार्यकर्त्यांनी जुने गोवा पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर सायंकाळी अटकेची कारवाई करण्यात आली.
आरजीचे प्रमुख मनोज परब, आमदार वीरेश बोरकर आणि कार्यकर्त्यांनी जुने गोवा पोलीस स्थानकात जाऊन पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. तक्रार दाखल करून पंच शंकर नाईक यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. चिंबलचे पंच शंकर नाईक यांचे आडनाव गोमंतकीय असले तरी ते गोमंतकीय नाहीत. त्यांनी आडनाव बदलले आहे. आरजी बिगर गोमंतकीयांच्या विरोधात आंदोलन करते. त्यामुळे त्यांनी आरजी कार्यकर्त्यांना शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल केला. या व्हिडिओत त्यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला, असे आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी सांगितले.
सरकार बिगर गोमंतकीयांची बाजू घेते. त्यामुळे व्हिडिओ काढून धमकवण्याचे धाडस बिगर गोमंतकीयांना होत आहे. असले प्रकार आरजी खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार वीरेश बोरकर यांनी दिला.