दिल्ली कारस्फोटाचा तपास एनआयएकडे

लवकर अहवाल देण्याचे आदेश : दोषींना कठोर शिक्षा देण्याचा केंद्रीय गृहमंत्र्यांचा इशारा


3 hours ago
दिल्ली कारस्फोटाचा तपास एनआयएकडे

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाच्या २० तासांनंतर गृह मंत्रालयाने कार बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएकडे सुपूर्द केला आहे. स्फोट प्रकरणात तारिक अहमद मलिक, आमिर रशिद, उमर राशिद या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आमिर आणि उमर हे दोघे भाऊ आहेत. जैश ए मोहम्मद विंगची हेड डॉ. शाहीना शहिद हिला पोलिसांनी अटक केली आहे.
दिल्लीतील भीषण स्फोटामागील सर्व आरोपींना पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तपासाचा आढावा घेण्यासाठी एक उच्च-स्तरीय बैठक घेतली. या बैठकीत शहा यांनी या घटनेसाठी जबाबदार प्रत्येक आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. या कृत्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला आपल्या यंत्रणांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. बैठकीला केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक तपन देका, दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा आणि एनआयएचे डायरेक्टर जनरल सदानंद वसंत दाते उपस्थित होते. जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी नलीन प्रभात व्हर्च्युअली बैठकीला उपस्थित होते.
सोमवार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.५२ वा. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ हा कार बॉम्बस्फोट झाला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनआयएला दिल्ली बॉम्बस्फोटांचा तपास अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. दोषींची ओळख पटवावी. कोणालाही सोडले जाणार नाही. त्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असेही शहा म्हणाले. दरम्यान, या स्फोटातील मृतांची संख्या १३ झाली आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. २० जखमींवर उपचार सुरू आहेत. दोन मृतदेहांची ओळख पटली आहे. उर्वरित मृतदेहांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटवली जाईल.
मंगळवारी स्फोटात वापरल्या गेलेल्या पांढऱ्या आय-२० कारचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. मेट्रो स्टेशन पार्किंगमधून बाहेर पडताना कारमध्ये काळा मास्क घातलेला एक माणूस बसलेला दिसला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील व्यक्तीची ओळख डॉ. मोहम्मद उमर नबी अशी झाली आहे. तो पुलवामा येथील रहिवासी आहे. उमरने स्फोटकांनी स्वतःला उडवून दिल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. प्राथमिक तपासात दिल्ली स्फोट आणि फरीदाबाद येथे समोर आलेले टेरर मॉड्यूल यांचा संबंध सूचित करणारे धागेदोरे मिळाल्यानंतर दिल्लीत अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
त्याच्या आई आणि दोन भावांना काश्मीर पोलिसांनी पुलवामा येथे डीएनए चाचणीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याचा मित्र डॉक्टर सज्जाद आणि त्याचे वडील यांनाही पुलवामा येथे ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, स्फोटात अमोनियम नायट्रेट, इंधन आणि डेटोनेटरचा वापर करण्यात आला होता. दहशतवादी मॉड्यूलमध्ये हरियाणातील फरिदाबाद येथे अटक केलेली महिला डॉ. शाहीन शाहिद ही भारतात जैशच्या महिला विंगमध्ये जमात-उल-मोमिनतची प्रमुख होती.
स्फोट आत्मघातकी नाही, दहशतीत घडला
सूत्रांनुसार, सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की, स्फोट आत्मघातकी हल्ला नव्हता. तो दहशतीत घडला. दिल्ली-एनसीआर आणि पुलवामा येथे छाप्यांदरम्यान मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली होती. त्यामुळे संशयितावर दबाव वाढला होता. त्याने अविचारीपणे स्फोट घडवून आणण्याचे कृत्य केले. बॉम्ब पूर्णपणे तयार नव्हता, त्यामुळे स्फोटाचा परिणाम मर्यादित होता. स्फोटामुळे खड्डा निर्माण झाला नाही, तसेच कोणतेही श्रापनेल किंवा प्रक्षेपण सापडले नाही. स्फोटाच्या वेळी कार पुढे जात होती, त्यामुळे अनेक लोक जखमी झाले नाहीत. संशयिताने आत्मघातकी कार हल्ल्याच्या सामान्य पद्धतीचे पालन केले नाही. त्याने कार कोणत्याही लक्ष्यावर धडकवली नाही किंवा घुसवली नाही.
मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी संध्याकाळी दिल्ली बॉम्बस्फोटात बाधित झालेल्यांना आर्थिक मदत जाहीर केली. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देण्यात येतील. जे पूर्णपणे अपंग झाले आहेत, त्यांना ५ लाख रुपये देण्यात येतील. गंभीर जखमींना २ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

कोण आहे डॉ. शाहीना शहिद ?
डॉ. शाहीना शहिद ही जैश ए मोहम्मदच्या महिला विंगची म्हणजेच जमात-उल-मोमिनातची प्रमुख होती.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार शाहीनाला भारतात महिलांना कट्टरपंथी विचारधारांशी जोडण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
फंडिंग, मानसिक स्तरावरचं द्वंद्व, प्रचार या सगळ्या गोष्टींची तिला जबाबदारी देण्यात आली होती.
डॉ. शाहीनाला दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे.
डॉ. शाहीना लखनऊ येथील लाल बाग परिसरात वास्तव्य करत होती.
फरिदाबाद येथील दहशतवादाचे मोड्युल पोलिसांनी उधळून लावले. त्यात अटक करण्यात आलेल्यांमध्ये डॉ. शाहीनाही आहे.

माझ्या मुलांची सुटका करा : डॉ. शकिल यांची आई
फरीदाबादच्या धौज गावात डॉ. मुझम्मिल शकिल याच्या भाड्याच्या घरातून ३६० किलो स्फोटक साहित्य आणि दारूगोळा जप्त केल्यानंतर त्याला सोमवारी सकाळी अटक करण्यात आली. दरम्यान त्याची आई, नसीमा यांनी दावा केला आहे की, मुझम्मिल चार वर्षांपूर्वीच घर सोडून गेला होता. तो दिल्लीत डॉक्टर म्हणून काम करतो आहे. या काळत त्याच्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही. आम्हाला याबद्दल दुसऱ्यांकडून समजले. आम्ही त्याला भेटण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी आम्हाला भेटू दिले नाही. माझ्या दुसऱ्या मुलालाही अटक केली आहे.माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्या दोन्ही मुलांची सुटका व्हावी.
डॉ. मुझम्मिल शकिलच्या घरातून स्फोटके जप्त
पोलिसांनी सांगितले की, डॉ. मुझम्मिल शकिल याच्या निवासस्थानातून स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. त्याने धौज येथे जवळपास एक महिन्यापूर्वी घर भाड्याने घेतले होते. प्राथमिक अहवालात असे सांगितले जात होते की, रविवारी राबवलेल्या मोहिमेत आरडीएक्स सापडले आहे, मात्र नंतर पोलिसांनी ते अमोनियम नायट्रेट असल्याचे स्पष्ट केले. शकिल हा एमबीबीएस पदवी असलेला व्यक्ती असून त्याने भाड्याने घेतलेल्या धौज येथील घरात स्फोटके आणि शस्त्रास्त्रे सापडली आहेत. फरिदाबादचे पोलीस आयुक्त सतेंदर कुमार गुप्ता यांनी सांगितले की, शकिल हा धौज येथील अल फलाह विद्यापीठामध्ये शिकवत होता. शकिलने फतेहपूर टागा येथील घर सुमारे आठ महिन्यांपूर्वी भाड्याने घेतले होते. दरम्यान धौज येथील रिकव्हरीनंतर फरीदाबादच्या फतेहपूर टागा गावातील एका घरातून जवळपास २,५६३ किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले आहे. 

अद्दल घडवली जाईल : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावर आहेत. भूतानचे राजे जिगमे खेसर यांच्या ७०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले, “सोमवारी संध्याकाळी दिल्लीत घडलेल्या भयावह घटनेने सगळ्यांना दु:खी केले. मी पीडित कुटुंबीयांचे दु:ख समजू शकतो. मी काल रात्रभर या घटनेचा तपास करणाऱ्या सर्व यंत्रणा, महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या संपर्कात होतो. आमच्या तपास यंत्रणा या कारस्थानाच्या मुळापर्यंत जातील. हे कारस्थान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. जे कुणी या घटनेसाठी जबाबदार आहेत, त्यांना अद्दल घडवली जाईल.’’