‘नोकरीसाठी पैसे’ : पूजा नाईकची क्राईम ब्रांचकडून पुन्हा चौकशी

दाव्यावर ठाम मात्र पुरावे दिले नाहीत


3 hours ago
‘नोकरीसाठी पैसे’ : पूजा नाईकची क्राईम ब्रांचकडून पुन्हा चौकशी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नोकरीसाठी पैसे देण्याच्या घोटाळ्यातील प्रमुख संशयित पूजा नाईक हिने आयएएस अधिकारी आणि अभियंत्याला पैसे दिल्याचा दावा केला होता. या दाव्यावर ठाम राहिल्यानंतर गुन्हा शाखेकडून तिची पुन्हा मंगळवारी चौकशी करण्यात आली.
२०१९ पासून चर्चेत असलेल्या कथित नोकरीसाठी पैसे देण्याच्या प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिने प्रुडंट मीडियाशी बोलताना नुकताच धक्कादायक खुलासा केला होता. तिने एका आयएएस अधिकाऱ्याला आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अभियंत्याला नोकऱ्यांसाठी ६०० जणांकडून सुमारे १७ कोटी रुपये जमवून दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी २४ तासांत पैसे परत न केल्यास पुराव्यासह मुख्यमंत्र्यांना माहिती देण्याचा इशाराही तिने दिला होता. या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर रविवारी गुन्हा शाखेने पूजा नाईक हिची चार तास चौकशी केली. त्यात तिने २०१९ ते २०२१ दरम्यान नोकरीसाठी पैसे दिलेल्या आयएएस अधिकारी आणि अभियंत्याचे नाव उघड केल्याचे सूत्रांनी सांगितले. याच दरम्यान सोमवारी पूजा नाईक हिची डिचोली पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर मंगळवार, ११ रोजी सायंकाळी गुन्हा शाखेने तिची पुन्हा चौकशी केली. मात्र, तिने केलेल्या दाव्यासंदर्भात अद्याप पुरावे गुन्हा शाखेकडे किंवा इतर ठिकाणी दिलेले नाहीत.