बाणावलीत दशकांपूर्वी बुजलेल्या नैसर्गिक झर्‍याला पुनरुज्जीवन

सामाजिक कार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी स्वखर्चाने केले खोदकाम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd March, 12:09 am
बाणावलीत दशकांपूर्वी बुजलेल्या नैसर्गिक झर्‍याला पुनरुज्जीवन

मडगाव : बाणावलीत मागील ४० वर्षांपूर्वी पाण्याने भरुन वाहणारा झरा कालांतराने मातीखाली बुजला गेला होता. सामाजिक कार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी स्वखर्चाने खोदकाम करत झर्‍याचे पुनरुज्जीवन केले आहे. या झर्‍यातून आता पहिल्यासारखे पाणी वाहू लागले आहे. पाण्याच्या स्त्रोतांची जपणूक करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

अनेक ठिकाणी वर्षांपूर्वी वाहणारे नैसर्गिक झरे व पाण्याचे स्त्रोत कालानुसार मातीखाली गाडले गेले आहेत. पाण्याची समस्या गंभीर होण्यापूर्वीच गावातील पाण्याच्या स्त्रोतांची काळजी घेत निगा राखण्याची गरज आहे. हे जाणून बाणावली गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. रॉक फर्नांडिस यांनी अनेकदा बाणावली पंचायतीकडे गावातील पाण्याच्या स्त्रोतांच्या जागा शोधून त्यांची निगा राखण्याची गरज असल्याची मागणी केली होती. मात्र, पंचायतीकडून कोणतीही कारवाई होत नव्हती. आता बाणावलीतील मागील ४० वर्षांपूर्वी पाण्याने भरुन वाहणारा झरा मातीखाली बुजलेला होता. सामाजिक कार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी सुमारे १ लाखाचा खर्च स्वत: करत हा नैसर्गिक झरा पूर्ववत केला आहे. स्थानिकांकडून झर्‍याबाबत विचारणा करुन जागेची माहिती करुन घेत खोदकाम हाती घेण्यात आले. त्यानुसार, आठ ते दहा फुटावर पाण्याचा झरा आढळून आला.

पंच एझलिना फर्नांडिस यांनी सांगितले की, गावातील नैसर्गिक झरे पूर्ववत करण्यासंदर्भात ठराव संमत करण्यात आला आहे. पंचायतीकडून यापुढील काम केले जाईल. गावातील नैसर्गिक स्त्रोत वाचवण्यासाठी व संवर्धनासाठी काम केले जाईल, असेही स्पष्ट केले.

नैसर्गिक झरा ही देवाने दिलेली देणगी आहे. राज्यात अनेक ठिकाणी मनुष्यनिर्मित संकटामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. अशावेळी नैसर्गिक झरे व इतर पाण्याचे स्त्रोत पुन्हा वाहते करण्याचे काम हाती घेण्याची गरज आहे. निसर्गाला हानी पोहोचवण्याऐवजी बाणावलीतील इतर ठिकाणी मातीच्या भरावामुळे बुजलेले झरे पुन्हा वाहते केले जातील, असे सामाजिक कार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी सांगितले. 

हेही वाचा