१५ ऑगस्टपूर्वी गोव्यातील सर्व पोलीस स्थानकांतील रिक्त पदे भरली जाणार

मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th July, 02:53 pm
१५ ऑगस्टपूर्वी गोव्यातील सर्व पोलीस स्थानकांतील रिक्त पदे भरली जाणार

पणजी : गोव्यातील पोलीस दलातील रिक्त पदांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, येत्या १५ ऑगस्टपूर्वी सर्व पोलीस स्थानकांतील रिक्त पदे भरली जातील. सुमारे ७०० पोलीस कर्मचारी सध्या आसाममध्ये प्रशिक्षण घेत असून, ते प्रशिक्षण पूर्ण करून लवकरच गोव्यात रुजू होतील.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोव्यातील पोलीस दलात असलेल्या मनुष्यबळाच्या कमतरतेकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, राज्यातील अनेक पोलीस स्थानकांमध्ये ९० टक्क्यांपर्यंत रिक्त पदे असून, काही ठिकाणी उपनिरीक्षक व अधिक उच्च पदेही रिक्त आहेत. वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर ही कमतरता गंभीर स्वरूपाची आहे. उच्च न्यायालयानेही याची दखल घेतली असल्याचे आलेमाव यांनी निदर्शनास आणले.

मुख्यमंत्री सावंत यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, सध्या राखीव दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांना तात्पुरते पोलीस स्थानकांमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय, १२ ऑगस्ट रोजी सुमारे ७०० पोलिसांचा प्रशिक्षण कालावढी पूर्ण होणार असून ते गोव्यात दाखल झाल्यानंतर १५ ऑगस्टपूर्वी रिक्त पदे भरली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा