उत्तर व दक्षिण गोव्यात झेडपी भवनांसाठी जागेचा शोध सुरू

पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो यांची माहिती

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th July, 02:08 pm
उत्तर व दक्षिण गोव्यात झेडपी भवनांसाठी जागेचा शोध सुरू

पणजी : उत्तर आणि दक्षिण गोव्यात जिल्हा पंचायत (झेडपी) भवनांची उभारणी करण्यासाठी सरकारने जागेचा शोध सुरू केला आहे. जागा निश्चित झाल्यानंतर लवकरच पुढील टप्प्याचे काम सुरू केले जाईल, अशी माहिती पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

दक्षिण गोव्यातील झेडपी कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचा मुद्दा आमदार उल्हास तुयेकार यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना मंत्री गुदिन्हो यांनी सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे मान्य केले. अतिरिक्त कर्मचाऱ्यांना दक्षिण गोव्यातील झेडपी कार्यालयात नियुक्त करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, लवकरच आवश्यक तांत्रिक मंजुरी मिळवून त्यावर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात झेडपी स्थापन होऊन २५ वर्षे झाली असून, आजवर प्रशस्त असे झेडपी कार्यालय उभारले गेलेले नाही. सध्या झेडपी कार्यालये भाड्याच्या इमारतींत चालवली जात आहेत. त्यामुळे स्वतंत्र झेडपी भवनांची गरज असून, सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले. उत्तर आणि दक्षिण गोव्यात स्वतंत्र व सुसज्ज झेडपी कार्यालये उभारण्याचा सरकारचा मानस असून, लवकरच ही केंद्रे प्रत्यक्षात उभी राहतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

हेही वाचा