सांखळी, फोंड्यात मुसळधारेमुळे विजेचा लपंडाव!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th April, 03:40 pm
सांखळी, फोंड्यात मुसळधारेमुळे विजेचा लपंडाव!

फोंडा/सांखळी : उत्तर गोव्यातील बहुतांश भागांना आज सकाळी अवकाळी पावसाने जवळपास ५ तास चांगलेच झोडपून काढले. सुदैवाने सोसाट्याचा वारा नव्हता. त्यामुळे कुठेही मोठी पडझड झाली नाही. मात्र, किरकोळ पडझड आणि ढगांच्या गडगडाटामुळे अनेक भागांत विजेचा लपंडाव सुरू होता. शहरी भागांतील रस्ते पाण्याखाली गेले होते.

फोंड्यात सकाळी १० वाजून २० मिनिटांनी पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. साधारण अडीच तासांनंतर सरींचा जोर कमी झाला. नंतर दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास पाऊस थांबला. या पावसामुळे फोंड्यातील जुने बस स्थानक व इतर रस्ते जलमय झाले होते. यामुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली.


कवळे व बेतोडा भागांत तीन-चार ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी लगेच धावपळ करत ही झाडे हटवली. दरम्यान, ढगांच्या गडगडाटामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम झाला. अनेक भागांत विजेचा लपंडाव सुरू होता.


सांखळी शहरात सकाळी ९ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी बाजारपेठ ओस पडली. ‌विठ्ठलापूर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या चैत्रोत्सवावरही पावसाचा परिणाम झाला. १८ तारखेपासून सुरू झालेला हा उत्सव २३ तारखेपर्यंत चालणार आहे. यानिमित्त देवस्थान परिसरात स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलधारकांनाही मुसळधार पावसाचा फटका बसला. पावसापासून साहित्याचा बचाव करण्यासाठी त्यांची चांगलीच धावपळ उडाली. दरम्यान, साखळी शहरातील गटारे तुंबून पाणी रस्त्यांवर पसरल्याने अनेक ठिकाणचे रस्ते जलमय झाले होते. 

हेही वाचा