गरज पडल्यास म्हापसा अर्बन बँकेची फाईल पुन्हा उघडणार - मुख्यमंत्री

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
18th April, 02:15 pm
गरज पडल्यास म्हापसा अर्बन बँकेची फाईल पुन्हा उघडणार - मुख्यमंत्री

पणजी : म्हापसा अर्बन बँकेत सुमारे ४ लाख गोवेकरांनी पैसे गुंतवले होते. त्यांच्या कष्टाचे पैसे बुडवले गेले. या प्रकरणी आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. सध्या हे प्रकरण केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयाकडे ( सीआरसीएस) प्रलंबित आहे. गरज पडल्यास याची फाईल पुन्हा उघडता येऊ शकते अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली. गुरुवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले की, मी कुणालाही धमकी देत नाही तशी आम्हाला सवय देखील नाही. मात्र म्हापसा अर्बन बँकेतील भागधारकांचे पैसे कोणी बुडवले ? कसे बुडवले हे देखील विरोधी पक्षांनी सांगावे. गोव्यातल्या लोकांनी स्वतःच्या खिशातील कष्टाने जमवलेले पैसे बँकेत ठेवले. त्यावेळी ठेवलेल्या ३५ हजार रुपयांची किंमत आता तीन लाख पेक्षा जास्त आहे. आपले पैसे बुडवले हे गोव्यातील लोक विसरलेले नाहीत. पैसे बुडवणाऱ्यांना लोकांची हाय लागली आहे. 

ते म्हणाले, या बँकेवर लिक्वीडेटर घालून लोकांचे थोडेफार पैसे परत देण्याचा प्रयत्न केला जात आहे.माझ्यावर किंवा आमच्या पक्षावर बोलणाऱ्या लोकांनी या बँकेविषयी देखील बोलावे. काही उमेदवारांनी लोकांचे पैसे बेकायदेशीर मार्गाने लुटले आहेत. काही लोकांनी सत्तेचा दुरुपयोग केला. आम्ही राजकारणाचा वापर स्वतः साठी केलेला नाही. आमच्यासाठी देश आणि राज्य प्रथम आहे.

हेही वाचा