कार्डिनल फिलिप नेरी फेर्राव यांचे आवाहन भाजपच्या फायद्याचे - मुख्यमंत्री

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
18th April, 01:57 pm
कार्डिनल फिलिप नेरी फेर्राव यांचे आवाहन भाजपच्या फायद्याचे - मुख्यमंत्री

पणजी : कार्डिनल फिलिप नेरी फेर्राव यांनी कॅथलिक समाजाला धर्मनिरपेक्ष उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. खरे पाहता काँग्रेस पेक्षा भाजपच जास्त धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. यामुळे भाजपलाच फायदा होणार असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. गुरुवारी पणजी येथे भाजपच्या केंद्रीय संकल्प पत्राचे अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपो उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही कार्डिनल यांच्या निवेदनाचे स्वागत करतो. गोव्यातील भाजप सरकारने २०१२ ते २०२४ मध्ये अल्पसंख्याक समाजासाठी खूप काम केले आहे. आम्ही एक्सपोझिशनसाठी तसेच चर्चसाठी जास्त काम केले आहे. केंद्रातील भाजप सरकारने देखील सबका साथ साबका विकास या धोरणाने काम केले आहे. केंद्र सरकारने अल्पसंख्यांक आयोगाला बळकट केले आहे. त्यामुळे भाजप खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहे. चर्चने धर्मनिरपेक्ष उमेदवारांना मत देण्याचे केलेले आवाहन हे भाजपासाठीच आहे असे आम्ही समजतो. 

ते म्हणाले, काहीजण धेंपो ब्रँड हा भाजप पेक्षा मोठा आहे असे म्हणत आहे. मात्र यात तथ्य नाही. भाजप पक्ष हा धेंपो समुहापेक्षा मोठा आहे. या समूहाने गोव्यातील औद्योगिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. पल्लवी धेंपो या देखील लोकप्रिय आहेत. याच्या आधारावरच आम्ही त्यांना उमेदवारी दिली आहे. केंद्रातील भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात सामान्य लोकांना विविध योजना दिल्या आहेत. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे गेल्याने भ्रष्टाचार संपला आहे.

अमित शहा २४ रोजी गोव्यात

तानावडे यांनी सांगितले की , भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा प्रचाराचा पहिला टप्पा संपला असून दुसरा टप्पा निम्म्यावर पोहोचला आहे. यातील एक भाग म्हणून पक्षाचे स्टार प्रचारक गोव्यात येणार आहेत . येत्या २४ एप्रिल रोजी गृहमंत्री अमित शहा यांची गोव्यात सभा होणार आहे. तर २५ रोजी विनोद तावडे यांची सभा होईल.





 


हेही वाचा