रानटी जनावरांच्या उपद्रवासंबंधी श्रीपाद, खलपांनी भूमिका जाहीर करावी!

सत्तरीतील शेतकऱ्यांची मागणी : सरकारने निश्चित धोरण राबवावे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th April, 11:53 pm
रानटी जनावरांच्या उपद्रवासंबंधी श्रीपाद, खलपांनी भूमिका जाहीर करावी!

वाळपई : लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या भाजप, काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सत्तरी तालुक्यातील रानटी जनावरांचा उपद्रव संदर्भात आपली भूमिका जाहीर करावी. श्रीपाद नाईक यांनी याबाबत अजिबात आवाज उठविलेला नाही. त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

सत्तरी तालुक्यातील शेतकरी बांधवांसमोर रानटी जनावरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शेतकरी बांधव यामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक भागांमध्ये असलेल्या लागवडी बंद झाल्या आहेत. यामुळे येणाऱ्या काळात लोकसभेत रानटी जनावरांच्या प्रश्नांसंदर्भात आवाज उठवावा. याबाबत सरकारने धोरण निश्चित करणे गरजेचे आहे. त्यासाठी श्रीपाद नाईक व रमाकांत खलप यांनी आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

गेल्या दहा वर्षांपासून सत्तरी तालुक्यातील शेतकरी बांधवांना रानटी जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात भासू लागला आहे. नारळ, केळी, आंबा, काजू अशा अनेक उत्पादनावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसत आहे. नारळ उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेले आहे. शेतकरी बांधवांनी विविध संघटनांच्या माध्यमातून रानटी जनावरांच्या उपद्रवासंदर्भात संघर्ष केला. सभांचे आयोजन केले, मोर्चे काढले, धरणे आंदोलन केले. संबंधितांना निवेदने सादर केली. वेगवेगळ्या राजकीय पक्षांना या संदर्भात विनंती केल्या. मात्र, अजूनपर्यंत सरकारने रानटी जनावरांसंदर्भात कोणत्याही प्रकारचे धोरण जाहीर केलेले नाही.

खासदार श्रीपाद नाईक यांनी या संदर्भात विशेष लक्ष देण्याची गरज होती. येथील मोठ्या प्रमाणात असलेल्या शेतकरी बांधवांचे अस्तित्व टिकायचे असेल तर रानटी जनावरांच्या उपद्रवाबाबत निश्चित धोरण तयार करून शेतकरी बांधवांना अभय देणे गरजेचे आहे. याबाबत श्रीपाद नाईक व रमाकांत खलप यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असे शेतकरी गोपाळ गावकर यांनी सांगितले. 

शेतकऱ्याचे अस्तित्व राहिले तरच येणाऱ्या काळात बागायती वाचू शकतात. मात्र जनावरांचा उपद्रव वाढल्यामुळे सरकारने धोरण निश्चित न केल्यास त्याचे गंभीर परिणाम शेतकरी बांधवांच्या अस्तित्वावर होऊ शकतात, असे शेतकरी महादेव गावस यांनी सांगितले.