लाच प्रकरणात पोलीस निरीक्षक विद्धेश पिळगावकरला अटक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
20th April, 04:27 pm
लाच प्रकरणात पोलीस निरीक्षक विद्धेश पिळगावकरला अटक

म्हापसा : केरी पॅराग्लायडिंग लाच प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी) तेरेखोल किनारी पोलीस स्थानकाचे तत्कालिन निरीक्षक विद्धेश पिळगावकर यांना अटक केली आहे. या प्रकरणी एसीबीकडून यापूर्वी हवालदार संजय तळकर आणि उदयराज उर्फ राजू कळंगुटकर या दोघांना अटक केली होती.

या प्रकरणी एसीबीकडे पृथ्वी एच. एन. यांनी तक्रार केली होती. फिर्यादी पृथ्वी एच. एन. हे केरी समुद्रकिनारी परिसरात पॅराग्लायडिंग व्यवसाय करतात. हा व्यवसाय करण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक परवाना नसल्याचा दावा करून जानेवारी २०२४ मध्ये प्रतिमहिना १० हजार रुपयांची लाच देण्याची मागणी तेरेखाल किनारी पोलीस स्थानकातील पोलीस हवालदार संजय तळकर यांनी केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. शिवाय नंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या मध्यस्थीमुळे या लाचेची रक्कम ८ हजार रुपये महिना ठरले होते. तक्रारदाराने ऑनलाईन अॅपद्वारे ही ८ हजार रुपयांची लाच दिली होती.

दरम्यान, २२ मार्च रोजी संशयित पोलिसांनी तक्रारदाराच्या विरोधात खोटे आरोप करून गुन्हा दाखल केला. त्याचे पॅराग्लायडिंग साहित्य जप्त केले. पण, या संदर्भात योग्य दस्तावेज नसताना कारवाई करण्याचा बनाव करण्यात आल्याचा दावा करत तक्राराने एसीबीकडे पुरावे सादर केले होते. त्यानुसार एसीबीने या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला करून संशयित हवालदार संजय तळकर यांची चौकशी केली. तसेच पोलीस खात्याने पोलीस निरीक्षक विद्धेश पिळगावकर यांनी तत्काळ जीआरपीमध्ये बदली केली होती.

* गुन्हा नोंद झाल्यामुळे ७ एप्रिल रोजी पोलीस खात्याने तळकर यांना सेवेतून निलंबित केले. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी त्याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात १२ एप्रिल रोजी फेटाळला आणि त्याच दिवशी एसीबीने त्यास अटक केली होती.

* या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी पोलीस हवालदार उदयराज उर्फ राजू कळंगुटकर यालाही १५ एप्रिल रोजी एसीबीकडून अटक करण्यात आली. त्यामुळे सेवेतून त्यालाही पोलीस खात्याने निलंबित केले होते.

* सध्या हे दोन्ही संशयित पोलीस कोठडीत असून त्यांच्या जामीन अर्जावर सोमवार दि. २२ रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

* दरम्यान, पोलीस निरीक्षक विद्धेश पिळगावकर याचाही या लाच प्रकरणात थेट संबंध असल्याचे वरील दोन्ही संशयितांच्या चौकशीतून उघड झाले. त्यामुळे आज (ता. २०) एसीबीने पिळगावकर यांना रितसर अटक केली.

एसीबीकडून लाच प्रकरणात अटक झालेले पोलीस निरीक्षक विद्धेश पिळगावकर हे काही दिवसांनी पर्यटनासाठी विदेश वारीवर जाणार होते. कॅनडाला रवाना होण्यापूर्वीच त्यांना ही अटक झाली आहे.

हेही वाचा