मडगावात अचानक पावसामुळे उडाली लोकांची तारांबळ,पण मिळाला उष्म्यापासून दिलासा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th April, 04:33 pm
मडगावात अचानक पावसामुळे उडाली लोकांची तारांबळ,पण मिळाला उष्म्यापासून दिलासा

मडगाव : मडगावसह सासष्टीतील बहुतांश भागात शनिवारी सकाळपासून गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. मडगावात काही रस्त्यांवर पाणी आलेले होते. तर दोन ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. या अचानक आलेल्या पावसाने विद्यार्थ्यांची व नागरिकांची तारांबळ उडवली तर हवेतील उष्मा कमी झाल्याने थोडा दिलासा मिळालेला आहे.

मडगावसह सासष्टी तालुक्यात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. गडगडाटासह आलेल्या पावसांच्या सरींमुळे काही रस्त्यांवर पाणी साचून राहिले. मडगावात पालिकेकडून मान्सूनपूर्व साफसफाईची कामे करण्यात येत असल्याने पावसाचे पाणी जास्त साचले नव्हते. याशिवाय रावणफोंड सर्कलपासून खारेबांध रस्त्यावरील सांडपाण्याच्या वाहिनीच्या कामात अडथळे आले. मागील दोन दिवस आभाळ भरुन आलेले होते पण पावसाचे चिन्ह नव्हते. वातावरणातील उष्मा वाढलेला असल्याने नागरिकांकडून पावसाची वाट पाहिली जात होती. सकाळी वेळेला अचानक बरसलेल्या पावसाने विद्यार्थ्यांसह कामावर जाणार्‍यांची तारांबळ उडवली पण हवेत गारवा पसरल्याने लोकांना काहीप्रमाणात दिलासा मिळालेला आहे.Monsoon arrives in Goa – The Navhind Times

मडगावात अग्निशामक दलाकडे सायंकाळपर्यंत चार कॉल आलेले होते. या पाण्यामुळे आर्लेम ते अंबाजी रस्त्यावर कचरा वाहून आलेला होता. त्यावर पाणी मारुन रस्ता वाहतुकीला सुरळीत करण्यात आला. दवर्ली जंक्शननजिक रस्त्यावर तेलाचे  तवंग साचल्याने त्यावर पाणी मारुन ते साफ करण्यात आले. दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयाकडे माड संरक्षक भिंतीसह रस्त्यावर उन्मळून पडला होता. अग्निशामक दलाने तो बाजूला करत रस्ता मोकळा केला. याशिवाय आके केरकर इस्पितळानजिक संरक्षक भिंतीवरील दिव्यामुळे झाडाला आग लागण्याची घटना घडली. यात दहा हजारांचे नुकसान झाले तर २ लाखांची मालमत्ता मडगाव अग्निशामक दलाने वाचवली. गोव्यात पडलेल्या पावसाचा कोकण रेल्वेच्या सेवांवर कोणताही परिणाम झालेला नाही. सर्व गाड्या आपापल्या वेळेत आल्याचे सांगण्यात आले. 


हेही वाचा