लोकसभा निवडणूक : उत्तर गोव्याच्या तुलनेत दक्षिणेतील उमेदवार अधिक ‘तरुण’

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th April, 03:28 pm
लोकसभा निवडणूक : उत्तर गोव्याच्या तुलनेत दक्षिणेतील उमेदवार अधिक ‘तरुण’

पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी १८ एप्रिल अखेरीस दोन्ही मतदासंघांतून एकूण २२ अर्ज दाखल झाले आहेत. यातील दुहेरी अर्ज वगळून उत्तरेतून ६ व दक्षिणेतून ५ अशा एकूण ११ उमेदारांनी अर्ज दाखल केले आहेत. उत्तर गोव्याच्या तुलनेत दक्षिण गोव्यातील उमेदवार अधिक तरुण आहेत. उत्तरेतील ६ उमेदवारांचे सरासरी वय ५३ आहे. तर दक्षिणेतील उमेदवारांचे सरासरी वय ४७ आहे. उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती मिळाली आहे.

दोन्ही मतदासंघांतील ११ उमेदवारांचे सरासरी वय ५० हून किंचित जास्त आहे. वयोमानानुसार पाहता काँग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड. रमकांत खलप हे सर्वात ज्येष्ठ उमेदवार ठरले आहेत. त्यांचे वय ७७ वर्षे आहे. तर याच मतदासंघांतील अपक्ष उमेदवार विशाल नाईक हे आतापर्यंत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारात सर्वात तरुण म्हणजे ३३ वर्षांचे आहेत. उत्तर गोव्यात खलप यांच्यानंतर  भाजपच्या श्रीपाद नाईक यांचा क्रमांक लागतो. त्यांचे वय ७१ वर्षे आहे.

उत्तर गोव्यात अपक्ष उमेदवार थॉमस फर्नांडिस यांचे वय ६१ वर्षे आहे. तर आखिल भारतीय परिवार पार्टी या पक्षाचे उमेदवार सखाराम नाईक ४२ वर्षांचे आहेत. उत्तरेच्या तुलनेत दक्षिण गोव्यातील उमेदवार तुलनेने तरुण आहेत. आरजीपीचे रूबर्ट परेरा ३९ वर्षांचे आहेत. अपक्ष डॉ. कालिदास वायंगणकर ४४ वर्षांचे, भाजपच्या पल्लवी धेंपो ४९ वर्षांच्या, अपक्ष ॲलेक्सी फर्नांडिस ४९ वर्षांचे तर काँग्रेसचे विरियातो फर्नांडिस ५४ वर्षांचे आहेत.

अपक्षात तिघे पदवीधर

अर्ज दाखल केलेल्या ४ अपक्ष उमेदवारांत दक्षिण गोव्यातील उमेदवार डॉ. कालिदास वायंगणकर यांनी गोमेकॉमधून एमबीबीएस पूर्ण केले आहे. उत्तरेतील विशाल नाईक यांनी बीएएलएलबी तर थॉमस फर्नांडिस यांनी मुंबई विद्यापीठातून बीकॉमची पदवी घेतली आहे.

हेही वाचा