म्हापशातील पे पार्किंग वाढीव दराबाबत पालिका मंडळ अनभिज्ञ

लेखा विभाग, मुख्याधिकाऱ्यांकडून परस्पर दरवाढलेखा विभाग, मुख्याधिकाऱ्यांकडून परस्पर दरवाढ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th April, 12:46 am
म्हापशातील पे पार्किंग वाढीव दराबाबत पालिका मंडळ अनभिज्ञ

म्हापसा : येथील टॅक्सी स्टॅण्डवरील पे-पार्किंग शुल्कामध्ये म्हापसा पालिकेने जीएसटीसह सरसकट ६० रूपये वाढ केली आहे. पालिका मंडळाला अंधरात ठेऊन लेखा विभाग व मुख्याधिकाऱ्यांनी परस्पररित्या ही दरवाढ लागू केली आहे. याप्रकारावर वृत्तपत्रे तसेच गोवा कॅन संस्थेने आवाज उठवल्यामुळे गुरुवारी १८ रोजी सकाळपासून टॅक्सी स्टॅण्डवरील पे पार्किंगचे शुल्क आकारणे पालिकेने तात्पुरते स्थगित ठेवले आहे.
एका जागृत ग्राहकाने या पे पार्किंग दराबाबत गोवा कॅन संस्थेकडे तक्रार केली होती. हा दर राजधानी पणजीतील पे-पार्किंग दरापेक्षा तिप्पट आहे. पालिकेच्या या मनमानी धोरणावरुद्ध गोवा कॅन संस्थेने पालिका संचालनालयाकडे याविषयी तक्रार करीत पालिकेकडून स्पष्टीकरण मागितवले आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या जूनमध्ये म्हापशातील पे पार्किंग शुल्काचे दर अधिसूचित केले होते. त्यानुसार दोन तासांसाठी दुचाकींना १० रूपये तर चारचाकीला २० रूपये असा हा दर अधिसूचित केला होता.
या अधिसूचनेचे पालिका मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी थेट उल्लंघन करीत तसेच पालिका मंडळाला विश्वासात न घेता टॅक्सी स्टॅण्डवरील पे पार्किंगच्या दरात वाढ केली. २० रूपयांवरून हा दर ५० रूपये केला. त्यात १० रूपये जीएसटी कर समावेश करून शुल्काची ही रक्कम ६० रूपये केली आणि हे नविन पे पार्किंगचे शुल्क सोमवारी १५ एप्रिल पासून आकारण्यास सुरूवात केली. पे पार्किंग दरामध्ये एवढी मोठी वाढ करण्याच्या निर्णयाविषयी विचारल्यास पालिका मुख्याधिकारी लेखा तथा प्रशासकीय अधिकाऱ्यांंकडे तर पालिकेच्या लेखा तथा प्रशासकिय अधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांकडे बोट दाखवले.
याविषयी नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर म्हणाल्या, सरकारकडून पार्किंगसोबत जीएसटी घेण्याचे परिपत्रक आले होते. त्यानुसार, पालिका कर्मचाऱ्यांनी जीएसटी घेण्यास सुरुवात केली. त्यामुळेच हा दर ६० रुपये झाला. यापूर्वी हा दर चारचाकींना ५० रुपये होता आणि जीएसटीमुळे आणखी १० रुपये वाढले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र पालिकेने चारचाकींना ५० रुपये शुल्क कधी लागू केले किंवा तसा ठराव पालिका बैठकीत घेण्यात आला आहे का, याचे समर्पक उत्तर त्यांना देता आले नाही. आपण हल्लीच नगराध्यक्षपदाची धुरा हाती घेतली आहे. वाढीव पे-पार्किंगचा ठराव घेतला आहे का, याची मी चौकशी करत आहे. त्यामुळे नगराध्यक्षा या एकंदरीत प्रकरणी अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट होते.
गेल्या वर्षीप्रमाणेच चालू आर्थिक वर्षातही पे-पार्किंग आणि सोपो निविदेला बोलीदार सापडलेला नाही. पालिकेने स्वत:च्या कर्मचाऱ्यांमार्फत या पे-पार्किंग व सोपो शुल्काची वसूली करण्यास सुरुवात केली आहे.
टॅक्सी स्टॅण्ड स्थानकावरील पे पार्किंग शुल्क फलकावर नवीन वाढीव दर लिहून त्याबाबतची माहिती वाहन मालकांना पालिकेने द्यायला हवी. पण फलकावरील पूर्वीचे दर खोडून हा बेकायदा प्रकार पालिकेने चालवला आहे. पालिका मंडळाने या पे-पार्किंग दर वाढीचा निर्णय घेतलेला नसताना हा नविन दर कसा लागू केला, असा सवाल गोवा कॅनने उपस्थित केला आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
प्रत्यक्षात अधिसूचित केलेला पे पार्किंगचा दर २० रूपये असताना म्हापसा पालिकेकडून ६० रूपये आकारले जात आहे. त्यामुळे या शुल्काच्या नावे घेतले जाणारे अतिरिक्त ४० रूपये कुणाच्या खिशात जातात, असा प्रश्न पालिका मंडळातील नगरसेवकांनीच उपस्थित केला आहे. हा बेकायदा व परस्पर निर्णय घेत पालिका मंडळाला वेठीस धरणाऱ्या या पालिका अधिकाऱ्यांवर नगरविकास खात्याने कारवाई करावी, अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे.

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व भाजपप्रणित पालिका मंडळाला आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भोंगळ गैरकारभाराची कल्पनाच नाही, हे यातून स्पष्ट होते. मार्केटमध्ये मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव आहे. पालिका मंडळाकडून ठराव न घेता लोकांकडून वाढीव पैसे वसूल केले जातात, हे गणित समजण्या पलिकडचे आहे.
- अॅड. शशांक नार्वेकर, नगरसेवक       
                 

हेही वाचा