दक्षिण गोव्यात चाेरांचा धुमाकूळ सुरूच

पोलिसांच्या गस्तीनंतरही चोरीच्या घटना : चोर मोकाटच, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th April, 12:40 am
दक्षिण गोव्यात चाेरांचा धुमाकूळ सुरूच

मडगाव : दक्षिण गोव्यातील चोऱ्यांच्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्यात आली. मात्र, त्यानंतरही चोऱ्या थांबलेल्या नाहीत. घरांसह मंदिरे व शाळांनाही चोरांनी लक्ष्य केले आहे. एकीकडे चोर सापडत नाहीत आणि दुसरीकडे चोऱ्यांचे प्रकारही थांबताना दिसत नाहीत. त्यामुळे या चोऱ्यांचा छडा लावायचा तरी कसा, हा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.
याच आठवड्यात रविवारी बेताळभाटीतील बंद घरात चोरीचा प्रयत्न झाला. त्याचदिवशी बाळ्ळी येथील घरातून ४.३२ लाखांचा ऐवज चोरीला गेला, बुधवारी रात्री लोलयेतील तीन घरे फोडून लाखाेंचा ऐवज लुटण्यात आला ,तर गुरुवारी रात्री कुंकळ्ळीत साडेआठ लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला. सासष्टी तालुक्याला चोरांनी सध्या लक्ष्य केल्याचे दिसून येते. चोरींच्या घटनांची पाहणी केली असता मार्च महिन्यांत वास्को, कुंकळ्ळी व वेळ्ळीतील शाळांतून चोऱ्या वाढल्याचे दिसते. तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून बंद घरांसह वस्ती असलेल्या घरांतही चोरीच्या घटनांत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. पोलिसांकडून रात्रीच्या वेळी गस्त घालण्यात येत असतानाही चोरीच्या घटनांतील वाढ ही चिंतेची बाब आहे.
देवालये, विद्यालये लक्ष्य
१ मार्च रोजी आगोंद येथील आगोंदेश्वर देवालयातील फंडपेटी फोडून चोरांनी ८० हजारांची रोकड व मंदिरातील घंटा, समई व इतर असे दोन लाखांचे साहित्य लंपास केले. १० मार्च रोजी आल्त दाबोळी येथील केशव स्मृती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये घुसून चोरांनी सुमारे ५० हजारांचा मुद्देमाल चोरला. आल्त दाबोळी येथील एका इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लटॅमधील चार मोबाईल व कॅमेरा असा एक लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल चोरांनी लांबविला. विमानतळावर काम करणारे युवक फ्लॅटमध्ये झोपलेले असतानाही १५ मार्च रोजी ही घटना घडली. २८ मार्च रोजी दुर्भाट फोंडा येथील साईबाबा मंदिरातील फंडपेटी फोडून सुमारे ५० हजार रुपयांची चोरी केली. २१ मार्च रोजी धारबांदोडा येथील बंद असलेल्या संजीवनी साखर कारखान्याच्या परिसरातील साहित्याची चोरी झाली.
स्पीकर, माईक, गिटारही चोरीस...
१८ मार्च ते २७ मार्च या कालावधीत जोसेफ टोरितो यांच्या गोंयचे भाट, आंबेली येथील लग्नाच्या हॉलच्या दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करून स्पीकर, माईक, गिटार यासह इतर साहित्याची चोरी करण्यात आली. कुंकळ्ळी पोलीस ठाण्यात २९ मार्च रोजी लग्नाच्या हॉलमधून ५ लाख ३९ हजारांचे साहित्य चोरीला गेल्याचे प्रकरण नोंद आहे. केपे परिसरातील शिरदोण-मळकर्णे येथील प्रीती सामंत यांच्या घरी २८ मार्च रोजी चोरी झाली. मुख्य दरवाजा तोडून चोरांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून सोनसाखळी, सोन्याचा हार असा १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला. या सर्व घटनांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पण, चोर सापडलेले नाहीत व चोरीला गेलेला मुद्देमालही हाती लागलेला नाही.
काणकोणात ‘हातसफाई’
काणकोणातील लोलये-दापट परिसरातील तीन घरांना चोरांनी बुधवारी रात्री लक्ष्य केले. आलुलिया फर्नांडिस यांच्या घराचे प्रवेशद्वार तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या बाजूच्या लेलिस डिसिल्वा यांच्या बंद घरातील लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. त्यानंतर नातालिना कोर्त यांच्या घरातही घुसून चोरी करण्याचा प्रयत्न झाला.
केवळ एका प्रकरणात चोर जेरबंद
बायणा-वास्को येथील अवर लेडी ऑफ कॅण्डेलारिया या हायस्कूलमध्ये ३० मार्च रोजी मध्यरात्री दोन अज्ञातांनी हायस्कूलच्या कार्यालयाचे कुलूप तोडून प्रवेश केला व चोरीचा प्रयत्न केला. यावेळी सीसीटीव्हीतील यंत्रणेतून मुख्याध्यापिकेच्या मोबाईलवर नोटिफिकेशन गेल्यामुळे वास्को पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर जाहीद सिरान (३२, उडपी) व मौलानी सत्तार जमादार (२८, दांडेली) या दोघांना वास्को पोलिसांनी अटक केली.
समाजमाध्यमांवरील व्यथेनंतर गुन्हा नोंद
‘वेर्णेकर इन अमेरिका’ या नावाने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध असलेले सोहित वेर्णेकर हे सध्या कुटुंबीयांसमवेत तळावली-नावेली येथे वास्तव्यास आहेत. मूळ गोमंतकीय सोहित व जेस्सिका हे दाम्पत्य अमेरिकन रहिवासी असून पत्नीच्या उपचारासाठी ते गोव्यात आले आहेत. २४ मार्च रोजी ते इस्पितळात गेले असताना भरदिवसा अज्ञात चोरांनी घराच्या मागील बाजूला असलेल्या खिडकीची काच फोडून प्रवेश केला व कपाटातील सुमारे ४५ लाखांचे दागिने चोरले. याबाबत मडगाव पोलिसांनी तपासाला काही वेळ घेतला असता, सोहित यांनी समाजमाध्यमांवरून व्यथा मांडली व त्यानंतर त्याच दिवशी मडगाव पोलिसांकडून चोरीप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.
कुंकळ्ळी पोलीस कार्यक्षेत्रात सलग घटना
रविवार दि. १४ एप्रिल रोजी रात्री पाट्टे-बाळ्ळी येथील लॉनिटा सिल्वा यांच्या घरात चोरी झाली. सिल्वा कुटुंबीय घरात झोपलेले असताना अज्ञात चोरांनी घराची कौले काढून घरातील कपाट खोलून ४.३२ लाखांचा मुद्देमाल चोरला. या घटनेच्या चार दिवसांनंतरच १८ एप्रिल रोजी रात्री केगदीकट्टो-कुंकळ्ळी येथे भाड्याने राहणाऱ्या ओपेंद्र पावल यांच्या घराचा दरवाजा फोडून रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला.

हेही वाचा