Goan Varta News Ad

एचडीएफसी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी शशिधर जगदीशन

२७ ऑक्टोबर रोजी स्वीकारणार पदभार

|
07th August 2020, 12:30 Hrs
एचडीएफसी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी शशिधर जगदीशन

मुंबई : एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शशिधर जगदीशन यांच्या नियुक्तीला भारतीय रिझर्व बँकेने मंजुरी दिली आहे. ही नियुक्ती २७ ऑक्टोबर २०२० पासून पुढील ३ वर्षांच्या काळासाठी आहे. बँकेच्या स्थापनेपासून तिचे नेतृत्व करणारे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी २६ ऑक्टोबर रोजी निवृत्त होत आहेत.जगदीशन १९९६ मध्ये बँकेत रूजू झाले आणि तेव्हापासून बँकेच्या वाढीत त्यांनी निर्णायक भूमिका बजावली आहे. वित्त विभागात व्यवस्थापक म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या जगदीशन यांनी तेव्हापासून अनेकविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. १९९९ मध्ये ते बिझनेस हेड-फायनान्स झाले, तर २००८ मध्ये बँकेचे मुख्य वित्तीय अधिकारी झाले. २०१९ मध्ये त्यांची नियुक्ती ‘चेंज एजंट ऑफ द बँक’ म्हणून करण्यात आली आणि त्यांना विधी आणि सचिव, मनुष्यबळविकास, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, संरचना आणि प्रशासन तसेच सीएसआर आदी विभागांची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्याकडे ३० वर्षांचा अनुभव आहे. त्यांतील २४ वर्षे त्यांनी एचडीएफसी बँकेत घालवली आहेत. एचडीएफसीमध्ये रूजू होण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील डॉइश बँक, एजीमध्ये ३ वर्षे काम केले होते. त्यांनी मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली असून, ते अर्हताधारक चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांनी यूकेतील शेफिल्ड विद्यापीठातून इकोनॉमिक्स ऑफ मनी, बँकिंग अँड फायनान्स या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
__
काेट
शशी यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बुद्ध्यांक आणि भावनांक यांचा अनोखा मेळ आहे. त्यांच्याकडे असलेली व्यवसायाची समज आणि तिला मिळालेली जनसंपर्काची जोड यांमुळे ते बँकेला एका नवीन स्तरावर घेऊन जातील, असा विश्वास आम्हाला वाटत आहे. त्यांच्यासोबत माझ्या शुभेच्छा कायम आहेत.
_ श्यामला गोपीनाथ, चेअरपर्सन, एचडीएफसी बँक लिमिटेड
__
या नियुक्तीबद्दल मी शशी यांचे अभिनंदन करतो. एचडीएफसी बँकेचे आजचे स्थान तिला प्राप्त करून देणाऱ्या तत्त्वप्रणालीची, संस्कृतीची जाण त्यांना आहे. आमचे अंगभूत सामर्थ्य आणि त्याला आता शशी यांच्या नेतृत्वाची जोड, यामुळे एचडीएफसी बँकेची सर्वोत्तम कामगिरी आगामी काळात बघायला मिळेल, असे मला वाटते.
आदित्य पुरी, व्यवस्थापकीय संचालक, एचडीएफसी बँक लिमिटेड
__
माझ्यासाठी ही खूपच सन्मानाची बाब आहे. पुरी यांच्या भूमिकेत जाणे अत्यंत कठीण आहे, याची मला जाणीव आहे. माझे सहकारी, मंडळ, अन्य संबंधित आणि अर्थातच देवाच्या कृपेने मी पुरी, मंडळ आणि नियामक यंत्रणेने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन, असा आत्मविश्वास वाटतो. हा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी आवश्यक ते सर्वकाही मी करेन. _ शशिधर जगदीशन, भावी व्यवस्थापकीय संचालक, एचडीएफसी बँक लिमिटेड