भाजपसोबत असल्याने टीडीपीच्या कामगिरीकडे लक्ष

Story: राज्यरंग |
09th May, 10:44 pm
भाजपसोबत असल्याने टीडीपीच्या कामगिरीकडे लक्ष

लोकसभेसोबतच आंध्र प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकाही होत आहेत. राज्यात लोकसभेच्या २५, तर विधानसभेच्या १७५ जागा आहेत. १३ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यात जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वायएसआर काँग्रेस पक्षाचे सरकार आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख विरोधी पक्ष आहे. यावेळी टीडीपीने भाजप आणि जन सेना पक्ष (जेएसपी) यांच्याशी युती केली आहे. विधानसभेच्या १४४ जागांवर टीडीपी, २१ जागांवर जेएसपी, तर १० जागांवर भाजप लढत आहे. लोकसभेच्या १७ जागांवर टीडीपीने, ६ जागांवर भाजपने, तर जेएसपीने २ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने २५ पैकी २२ जागांवर विजय मिळवला होता. टीडीपीला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेस, भाजप या राष्ट्रीय पक्षांच्या पाट्या कोऱ्याच राहिल्या होत्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेस पक्षाने १७५ पैकी १५१ जागांवर विजय नोंदवून स्पष्ट बहुमत मिळवले होते. टीडीपीला फक्त २३ जागा मिळाल्या होत्या. यंदा पिठापूरम मतदारसंघात लक्षवेधी लढत होत आहे. जेएसपी प्रमुख तथा अभिनेता पवन कल्याण आणि चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा येथे आमने-सामने आहेत.

लोकसभा निवडणुकीतील देशातील सर्वांत श्रीमंत उमेदवार गुंटूर मतदारसंघातून रिंगणात आहे. डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर असे त्यांचे नाव असून ते टीडीपीचे उमेदवार आहेत. ३७ पानी निवडणूक प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांनी ५,७८५.२८ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. ४८ वर्षीय पेम्मासानी चंद्रशेखर हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. इतरही अनेक व्यवसायांत ते यशस्वी झाले आहेत. डॉ. चंद्रशेखर यांचे कुटुंब मूळचे गुंटूर जिल्ह्यातील बुरीपलेमचे. त्यांनी ईएएमसीईटी मध्ये २७ वा क्रमांक मिळवला आणि उस्मानिया विद्यापीठातून एमबीबीएस केले. एमडी शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. त्यांची बहुतांश मालमत्ता अमेरिकेत आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये त्यांचे भारतातील उत्पन्न ३ लाख ६८ हजार ८४० रुपये होते. याच कालावधीत त्यांच्या पत्नी कोनेरू श्रीरत्ना यांनी १ लाख ४७ हजार ६८० रुपये मिळवले होते. त्यांच्याजवळ २,३१६ कोटी रुपयांची, तर कोनेरू श्रीरत्ना यांच्याकडे २,२८९ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. याशिवाय डॉ. चंद्रशेखर यांच्याकडे ७२ कोटी २४ हजार २४५ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. श्रीरत्ना यांची संपत्ती २४ कोटी ८२ लाख २२ हजार ५०७ रुपयांची आहे. दोघांकडे मिळून जगभरातील सुमारे १०१ कंपन्यांचे शेअर्स आहेत. दोघांवरही प्रत्येकी ५१९ कोटी रुपयांचे कर्ज आहे.

डॉ. चंद्रशेखर २०१४ पासून गुंटूरमधून इच्छुक होते. दोन वेळा गुंटूरचे खासदार झालेले जयदेव गल्ला यांनी यावर्षी जानेवारीत राजकारण सोडल्यानंतर डॉ. चंद्रशेखर यांना संधी मिळाली. डॉ. चंद्रशेखर यांचा सामना वायएसआर काँग्रेसचे के. वेंकट रोसैया यांच्याशी आहे. आतापर्यंत काँग्रेसने येथून १२ वेळा, तर टीडीपीने चार वेळा विजय नोंदवला आहे. यंदा वायएसआर काँग्रेस आणि टीडीपी यांच्यातच खरी लढत आहे. टीडीपी यंदा हॅटट्रिक साधण्यासाठी प्रयत्न करत आहे. पहिला विजय नोंदवण्यासाठी वायएसआर काँग्रेस व्यूहरचना आखत आहे.


प्रदीप जोशी, 

(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)